माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह चार आमदारांना उडवून देण्याची धमकी, व्यापाऱ्याकडे 1 लाखांची खंडणी मागितली; आरोपीला मुंबईतून अटक

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी उडवून देण्याचा कट रचल्याचा दावा करत एका व्यापाऱ्याकडे 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देणाऱ्या आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केली आहे. रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे (वय 39) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ashok Chavan

तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे कट रचल्याचा दावा करत व्यापाऱ्याला धमकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील व्यापारी महेश कृष्णाजी तुतारे आणि आरोपी रवी रोकडे यांची पूर्वीपासून ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत रोकडे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर संपर्क साधून तुतारे यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी महेश तुतारे घरी असताना आरोपीने त्यांना फोन करून एक लाख रुपयांची मागणी केली; मात्र तुतारे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर संतापलेल्या आरोपीने तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडमधील चार आमदारांना एकाच दिवशी उडवून देण्याचा प्लॅन केला होता, असा दावा फोनवरील संभाषणात केला. माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात असून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात कोणीही माझे काही बिघडवू शकत नाही, एक लाख रुपये दिले नाहीत तर आयुष्यभर लक्षात ठेवशील, अशा शब्दांत त्याने धमकावले. या धमकीनंतर महेश तुतारे यांनी तातडीने वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबईतील पेडर रोड परिसरातून अटक

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर नांदेडच्या पथकाने मुंबई पोलिसांच्या मदतीने पेडर रोड परिसरातील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाजवळ सापळा रचून रवी रोकडेला ताब्यात घेतले. आरोपी रवी रोकडे हा व्यवसायाने दिग्दर्शक असून मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टा येथील रहिवासी आहे, तर सध्या तो नांदेडच्या सिडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

कथित कट आणि मोठ्या लोकांच्या पाठिंब्यामागील सत्यता पोलीस तपासणार

अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव आणि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल भोसले व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीने केवळ व्यापाऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा बनाव रचला होता की खरोखरच यामागे काही गंभीर कट होता, तसेच त्याच्या दाव्यातील ते चार आमदार कोण आणि त्याला मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्याच्या विधानात किती तथ्य आहे, याचा सखोल तपास नांदेड पोलीस करत आहेत.

Ashok Chavan and Four MLAs Receive Death Threat, Accused Arrested in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात