विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: परदेशी हेरगिरी नेटवर्क आता केवळ हनी ट्रॅपपुरते मर्यादित राहिलेले नसून ते सायबर हेरगिरी आणि इतर आधुनिक मार्गांनी भारतीय संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा महत्त्वाचा इशारा एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी दिला आहे. संरक्षण क्षेत्राला बाहेरील घटकांपेक्षा अंतर्गत व्यक्तींच्या माध्यमातून माहिती लीक होण्याचा धोका अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, चालू 2026 या वर्षात आतापर्यंत हनी ट्रॅपची चार गंभीर प्रकरणे समोर आली असून त्यामध्ये नौदलाचे दोन जवान, हवाई दलाचा एक विंग कमांडर आणि एका माजी सैनिकाचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रेम, मल्टिलेव्हल मार्केटिंग आणि कर्जाच्या जाळ्यात अडकवून माहिती मिळवण्याचे प्रयत्न
आशुतोष दीक्षित यांनी स्पष्ट केले की, शत्रू राष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणा जवान आणि अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरत आहेत. यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासोबतच मल्टिलेव्हल मार्केटिंग (MLM) आणि कर्जाच्या जाळ्यात अडकवून आर्थिक दबावाखाली आणणे यांसारख्या पद्धतींचा समावेश आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनांना किंवा दबावाला बळी पडून अंतर्गत व्यक्तींकडून गोपनीय माहिती फुटण्याचा धोका सर्वाधिक असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माहिती चोरी रोखण्यासाठी संरक्षण संगणक नेटवर्क बाह्य इंटरनेटपासून वेगळे
लष्करी आणि संरक्षण संशोधन संस्थांनी हेरगिरीचे हे प्रकार रोखण्यासाठी आपली तांत्रिक सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम केली असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. सायबर हल्ल्यांचा आणि संवेदनशील माहितीच्या चोरीचा धोका पूर्णपणे कमी करण्यासाठी संरक्षण दलांचे संगणक नेटवर्क बाह्य नेटवर्कपासून अर्थात सामान्य इंटरनेटपासून वेगळे (‘एअर-गॅप’) करण्यात आले आहेत. यामुळे बाहेरील सायबर हल्लेखोरांना संरक्षण यंत्रणेच्या प्रणालीत शिरकाव करणे अत्यंत कठीण झाले आहे.
खासगी संरक्षण कंपन्या आणि डीआरडीओ प्रयोगशाळांसाठीही कडक सुरक्षा कवच
केवळ लष्करी आस्थापनाच नव्हे, तर सरकारी क्षेत्रातील संस्था, डीआरडीओच्या (DRDO) प्रयोगशाळा आणि खासगी संरक्षण उत्पादक कंपन्यांसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्थेवर काम सुरू आहे. खासगी संरक्षण कंपन्यांना नेटवर्कचा सुरक्षित वापर कसा करावा आणि सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी कोणते योग्य सॉफ्टवेअर निवडावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक स्वतंत्र संस्था कार्यरत आहे. संबंधित कंपन्यांनी या संस्थेने दिलेल्या सुरक्षा सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन केल्यास बहुतांश प्रकरणांमध्ये सायबर सुरक्षा धोक्यांपासून सहज बचाव करता येऊ शकतो, असेही आशुतोष दीक्षित यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App