विशेष प्रतिनिधी
मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व राज्यांत 50 टक्के जागा वाढल्यास डिलिमिटेशनवर सकारात्मक विचार करू, असे विधान केले होते. Natasha Awhad
मात्र, पक्षाच्या या संभाव्य भूमिकेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि पक्षाच्या युवक आघाडीच्या सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष जर या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल, तर मी त्याचा निषेध करते; या बिलाला पाठिंबा देणे म्हणजे देशाची आणि संविधानाची मोठी हानी करण्यासारखे आहे, अशा शब्दांत नताशा आव्हाड यांनी घरचा अहेर दिला आहे.
भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा हा घटनाबाह्य प्रयत्न: नताशा आव्हाड
नताशा आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्षाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय भूमिका मांडली होती?
या वादाच्या केंद्रस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका आहे. सुळे म्हणाल्या होत्या की, सध्या लोकसभेचे मतदारसंघ 25 आणि 30 लाख लोकसंख्येचे झाले असून इतके मोठे मतदारसंघ हाताळणे कोणत्याही खासदारासाठी अवघड काम आहे. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेच्या वेळी जर सर्वच राज्यांमध्ये समान पद्धतीने 50 टक्के जागा वाढवल्या गेल्या आणि महिला आरक्षण हा मुद्दा प्राधान्याने लागू झाला, तर आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू. यापूर्वी जेव्हा 50 टक्के जागावाढीचा फॉर्म्युला समोर आला होता, तेव्हा सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून आणि देशाच्या हिताचे असल्यास त्यावर विचार करण्याची सकारात्मक भूमिका आम्ही मांडली होती, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या याच विधानानंतर आता नताशा आव्हाड यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App