दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाला ब्रेक? शरद पवार गटाची NDA प्रवेशासाठी चाचपणी; केंद्रात मोठ्या खात्याचीही चर्चा!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता वेगळ्याच राजकीय समीकरणाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की स्वतंत्र राजकीय वाटचाल करणार, याबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, या संभाव्य विलीनीकरणाच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांना फोन करून त्यांची भूमिका जाणून घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आमदारांकडून तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मत जाणून घेण्याचा प्रयत्न

दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत आमदारांची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. विलीनीकरण करावे की करू नये, बदलत्या राजकीय परिस्थितीत कोणती भूमिका घ्यावी आणि भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये आमदारांची पसंती काय असेल, अशा मुद्द्यांवर त्यांची मते जाणून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गुरुवारी दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. ‘जेव्हा माझा भाऊ गेला, तेव्हाच विलीनीकरणाची चर्चा संपली,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विलीनीकरणाऐवजी NDA मध्ये स्वतंत्र प्रवेशाची चाचपणी?

या संपूर्ण राजकीय घडामोडीत सर्वाधिक महत्त्वाची माहिती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एनडीएमध्ये स्वतंत्र घटकपक्ष म्हणून सहभागी होण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची चर्चा. विलीनीकरणातील अडचणी लक्षात घेता दोन्ही पक्ष एकत्र येण्याऐवजी शरद पवारांचा पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून सत्तेत सहभागी होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

या पर्यायाला मूर्त स्वरूप मिळाल्यास शरद पवारांच्या पक्षाला केंद्रात महत्त्वाचे खाते आणि राज्याच्या मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. अर्थात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सुनेत्रा पवारांची विलीनीकरणाला पसंती नाही?

या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास भविष्यात पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्यास सध्या आपली मान्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवारांचा पक्ष स्वतंत्र घटकपक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी होणार असेल, तर त्याला आपला विरोध नसल्याचेही कळवण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या राजकारणात नवा ट्विस्ट!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडूनही विलीनीकरणाऐवजी शरद पवारांच्या पक्षाला स्वतंत्र घटकपक्ष म्हणून महायुतीत सहभागी करून घेण्याच्या पर्यायाला अनुकूलता असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार की शरद पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे एनडीएमध्ये सहभागी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांचे विधान, सुनेत्रा पवारांची कथित भूमिका आणि आमदारांशी सुरू असलेला संपर्क या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Merger of the two Nationalist parties halted

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात