विशेष प्रतिनिधी
पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
आपल्या अभिनयाने आणि लावणीच्या अदाकारीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आई, सासू अशा विविध भूमिका साकारत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या.
२७ नोव्हेंबर २०१६ हा मधू कांबीकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरला. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा नृत्य सादर करत होत्या. या कार्यक्रमात नृत्य करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी जिद्दीने भैरवीचे सादरीकरण पूर्ण केले. मात्र, त्यानंतर मेकअप रूममध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. या झटक्यामुळे त्यांचा उजवा हात बधिर झाला. या घटनेनंतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. पक्षाघाताच्या झटक्यानंतर मधू कांबीकर यांच्या प्रकृतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या. कालांतराने त्यांची तब्येत खालावत गेली. त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे अभिनय आणि नृत्य क्षेत्रात सक्रिय राहता आले नाही.
28 जुलै 1953 मध्ये त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. मधू कांबीकर या मराठी मनोरंजनविश्वातील महत्त्वाच्या अभिनेत्री होत्या. चित्रपटांमधील सहज अभिनय आणि लावणी सादर करण्याची त्यांची खास शैली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘माझा छकुला’ आणि ‘एक होता विदूषक’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App