केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र; ‘माही’ फेक अकाउंट, लोहगडाची रेकी अन् कथित हत्येचा कट

Ketan Agrawal murder case.

विशेष प्रतिनिधी

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी कथित पूर्वनियोजित कटाचे अनेक तपशील उघड केल्याचा दावा केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्रात डिजिटल पुरावे, मोबाइल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  Ketan Agrawal murder case.

मार्चपासून कटाची तयारी केल्याचा पोलिसांचा दावा

पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कथित कट अचानक आखण्यात आलेला नव्हता. सुरुवातीला केतनला ठार न करता गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा विचार करण्यात आला होता. यासाठी बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.

मात्र, या व्यक्तींमार्फत कट उघड होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा पर्याय सोडण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संपर्कातील एका व्यक्तीला साक्षीदार करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

लोहगडापूर्वी लोणावळ्यातील ठिकाणांची रेकी

हत्येसाठी योग्य ठिकाण शोधताना आरोपींनी लोणावळा परिसरातील काही डोंगर आणि पर्यटनस्थळांची पाहणी केल्याचा दावा दोषारोपपत्रात आहे. टायगर पॉईंटसह विविध ठिकाणांची रेकी करण्यात आली होती. काही भागांत सीसीटीव्हीची सुविधा नसल्याचे आरोपींच्या लक्षात आल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर लोहगडाची निवड करण्यात आली. या ठिकाणी यापूर्वी झालेल्या एका महिलेच्या मृत्यूच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला होता. केतनचा मृत्यू अपघाती पडल्यामुळे झाल्याचे भासवता येईल, असा कथित विचार आरोपींनी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

४ आणि १४ जूनच्या घटनांबाबत पोलिसांचे आरोप

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ४ जून रोजी सियाने केतनला लोहगडावर जाण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर ६ जून रोजी दोघे प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. प्रवासादरम्यान खालापूरमधील एका कॅफेत सियाने केतनचा पासपोर्ट फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बालीचा प्रवास रद्द झाला.

१४ जून रोजी सिया आणि केतन पुन्हा लोहगडावर गेले. यावेळी सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर साप असल्याचे सांगून केतनला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही दोषारोपपत्रात नमूद असल्याचे वृत्त आहे.

‘माही’ नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाउंटचा वापर

पहिले प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर केतनला पुन्हा लोहगडावर आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. सिया, चेतन आणि रितेश यांनी मिळून ‘माही’ नावाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले.

या अकाउंटवर एका परिचित तरुणीचा फोटो वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले. १८ जून रोजी या अकाउंटवरून केतनशी संपर्क साधण्यात आला. सियाची मैत्रीण असल्याचे भासवून तिच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर सरप्राईज देण्याच्या उद्देशाने केतनला तेथे आणण्यात आल्याचा आरोप आहे.

या योजनेत रितेश हांगेची महत्त्वाची भूमिका असल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे.



लोहगडावरील घटनेबाबत दोषारोपपत्रात काय?

पोलिसांच्या तपासानुसार, चेतन चौधरी दुसऱ्या मार्गाने लोहगडावर पोहोचला आणि मंदिराजवळ थांबला होता. सिया आणि केतन तेथे पोहोचल्यानंतर सियाने चेतनला खूण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

केतनचे लक्ष विचलित असताना त्याला मागून धक्का देण्यात आला आणि त्यानंतर चेतनने लाथ मारल्यामुळे तो दरीत कोसळला, असा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.

पोलिसांनी रितेश हांगे हा कथित कटाचा सूत्रधार असल्याचे नमूद केले आहे. घटनेनंतर ‘माही’ नावाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट हटवण्यात आल्याचेही तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.

हत्येशी संबंधित चित्रपट आणि प्रकरणांचा अभ्यास?

दोषारोपपत्रातील माहितीनुसार, आरोपींनी हत्येशी संबंधित चित्रपट पाहिले, तपास यंत्रणांपासून वाचण्यासंदर्भातील पॉडकास्ट ऐकले आणि मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाशी संबंधित माहितीचा अभ्यास केला, असा पोलिसांचा दावा आहे.

तपासात सिया गोयलने लोहगडावरील यापूर्वीच्या एका मृत्यूच्या घटनेबाबत ऑनलाइन शोध घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या डिजिटल शोधांचा समावेश पोलिसांनी पुराव्यांच्या तपासात केला आहे.

डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब

पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात व्हॉट्सॲप संदेश, छायाचित्रे, मोबाइल फोन डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषण अहवालांचा समावेश आहे.

विविध वृत्तांनुसार, पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ८० ते ८५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी काही साक्षीदारांनी कथित घटनेचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

न्यायालयीन प्रक्रियेत आरोपांची पडताळणी होणार

या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यातील आरोप, डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांची न्यायालयीन प्रक्रियेत तपासणी होणार आहे. आरोपी दोषी आहेत की निर्दोष, याचा अंतिम निर्णय न्यायालयाकडून होईल.

5,053-page charge sheet in the Ketan Agrawal murder case.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात