विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद शुक्रवारी पुण्यात पोहोचला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्यासह प्रशांत आंबी आणि त्यांच्या पत्नी आरती आंबी यांनी जवळपास तीन तास कोथरूड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. गायकवाड यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.
“पुणे पोलिस न्याय देण्याची भूमिका घेतात, मग आंबी कुटुंबाला न्याय का मिळत नाही?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींवर आरोप झाल्यास पोलिसांची भूमिका वेगळी असते, असा आरोपही त्यांनी केला.
प्रशांत आंबी यांनी गायकवाड यांनी फोनवरून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
आंबी यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेतली.
आंबी यांच्या पत्नी आणि आईनेही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली, मग गायकवाड यांच्याविरोधात तशीच कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रकरणात ५ सप्टेंबर रोजी सोनाली त्रिंबक कांबळे यांनीही कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार अर्ज दिला आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये घरात घुसून मारहाण करणे, जीभ कापणे आणि जीवे मारण्याची धमकी असल्याचा दावा कारवाईची मागणी करणाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका करत कायद्याच्या अंमलबजावणीत राजकीय पक्षपात होत असल्याचा आरोप केला.पूर्वी पोलिस ठाण्यांमध्ये ‘प्रथम नागरिक’ ही संकल्पना होती, मात्र आता राज्यात सत्ताधाऱ्यांना प्राधान्य देण्याची संस्कृती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होते, मात्र सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींविरोधातील तक्रारींबाबत वेगळी भूमिका घेतली जाते, असा आरोप पवार यांनी केला. अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी कमी होण्याचा धोका असल्याचेही त्यांनी म्हटले. या आंदोलनामुळे कोथरूड पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पुणे पोलिसांनी मात्र याच कथित घटनेप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सागर कवडे यांनी सांगितले की, प्रशांत आंबी यांच्या तक्रारीवरून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात आधीच अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून न्यायालयाच्या आदेशानुसार तेथे तपास सुरू आहे.
“एकाच घटनेचा दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तपास करता येत नाही किंवा त्याच घटनेप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करता येत नाही,” असे कवडे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App