साडी, गजरा अन् मराठीत भाषण; राणी मुखर्जीने महाराष्ट्राच्या मंचावर जिंकली सगळ्यांची मनं

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, या सोहळ्यात राणी मुखर्जीच्या खास अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राणी मुखर्जी पुरस्कार सोहळ्यासाठी चक्क मराठमोळ्या साजात सहभागी झाली होती. हिरव्या रंगाची सुंदर साडी, लाल पदर, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपरिक लूकमध्ये राणीने एन्ट्री केली. तिचा हा मराठमोळा अंदाज पाहून उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

विशेष म्हणजे पुरस्कार स्वीकारल्यानंतर आभार मानण्यासाठी माईक हातात घेताच राणीने थेट मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. तिच्या तोंडून अस्खलित मराठी ऐकून उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

‘महाराष्ट्र माझी जन्मभूमी, कर्मभूमी…’

आपल्या भाषणाची सुरुवात करताना राणी मुखर्जी म्हणाली, “माझ्यासाठी महाराष्ट्र एक राज्य नाही… महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे.”

पुढे ती म्हणाली, “मी मायानगरी मुंबईमध्ये जन्मले. माझं यश, अपयश सर्व काही मी इथेच पाहिलं. प्रत्येक क्षण इथेच जगले. हे पारितोषिक राज कपूर यांच्या नावाने मला दिलं जात आहे, याचा मला अभिमान आहे.”



सिनेसृष्टीतील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना राणीने सांगितले की, लहान वयात ती चित्रपटसृष्टीत आली. त्या वेळी आपल्याला नेमकं कुठपर्यंत जायचं आहे, याची कल्पना नव्हती. मात्र, आपल्या कामातून देशातील महिला आणि त्यांच्या सामर्थ्याची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले.

“कॅरेक्टर निवडताना त्याचा समाजावर काय परिणाम होईल, याचा मी नेहमी विचार करते. सिनेमाकडे मी कधीच केवळ प्रोफेशन म्हणून पाहिलं नाही. माझ्यासाठी सिनेमा हे एक इमोशन आहे,” असंही राणीने यावेळी सांगितलं.

‘मुंबईने मला माझी ओळख दिली…’

राणी मुखर्जी पुढे म्हणाली, “हजारो लोक सकाळी उठल्यावर स्वप्न पाहतात. सिनेसृष्टीत मॅजिक आणि पॉवर आहे. महाराष्ट्र माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, तर मुंबई हे माझं शहर आहे.”

“हे पारितोषिक मी महाराष्ट्राच्या नागरिकांना आणि संपूर्ण सिनेसृष्टीतील लोकांना समर्पित करते. मुंबईने मला माझी ओळख दिली, मला माझं घर दिलं आणि मला सुरक्षा दिली. त्यामुळे मुंबईचं एक वेगळं स्थान माझ्या मनात आहे,” असं राणीने सांगितलं.

महाराष्ट्राविषयीचा अभिमान व्यक्त करताना राणी म्हणाली, “महाराष्ट्राने मला दाखवलं की मी कोण आहे. महाराष्ट्राचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र!”

राणी मुखर्जीचा हा मराठमोळा अंदाज आणि मराठीतून केलेलं भाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पुरस्कार सोहळ्यातील तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते तिच्या मराठी भाषणाचे आणि पारंपरिक लूकचे कौतुक करत आहेत.

Rani Mukharjee In Maharashtra State Film Awards

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात