विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत डाव्या विचारांच्या पक्षांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (1 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजता आझाद मैदानात हे आंदोलन होणार असून निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) प्रक्रिया आणि मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणार आहे. Gyanesh Kuma
शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) यांच्यासह अन्य डाव्या विचारांचे पक्ष आणि संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांनी दिली.
‘ज्ञानेश कुमार, बस्स झालं!’चा नारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी हे आंदोलनातील प्रमुख मुद्द्यांपैकी एक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे ॲड. साम्या कोरडे यांनी म्हटले आहे.
SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पात्र मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली गेल्यास त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे.
‘मतदारयादीतील बदलांची जबाबदारी कोणाची? SIR प्रक्रियेतून निर्माण झालेल्या प्रश्नांना जबाबदार कोण? निवडणूक प्रक्रियेत उत्तरदायित्व कसे निश्चित केले जाणार?’ असे प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
‘लोकशाही वाचवा, मतदानाचा अधिकार जपा’
मतदारयादीतील नाव हा केवळ प्रशासकीय नोंदीचा विषय नसून तो नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित असल्याची भूमिका डाव्या पक्षांकडून मांडण्यात येत आहे. त्यामुळे पात्र मतदाराचे नाव प्रक्रियात्मक त्रुटींमुळे वगळले जाऊ नये, तसेच मतदारयादीतील बदलांबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, SIR आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशातील विविध विरोधी पक्षांकडूनही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मात्र आयोगातील वेगवेगळी मते ही अंतर्गत विचारविनिमयाचा भाग असल्याचे सांगितले असून अंतिम निर्णय सर्वानुमते झाल्याचे वृत्त आहे.
कोण कोण सहभागी होणार?
1 ऑक्टोबरला आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात शेकापचे राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. मिलिंद रानडे, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शैलेंद्र कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.)चे डॉ. विजय कुलकर्णी यांच्यासह डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच SIR प्रक्रियेबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. मुंबईतील या आंदोलनामुळे SIR आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App