आंदोलनाच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप; संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच मनोज जरांगे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कीर्तनकार ह. भ. प. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केल्याचा दावा केला आहे. संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची आणि संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. Manoj Jarange
ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना बारस्कर यांनी सांगितले की, ईडी कार्यालयाकडून त्यांना बोलावणे आले होते. त्यानुसार त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून कथितरीत्या अवैध संपत्ती मिळवल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्याकडे उपलब्ध असलेली काही कागदपत्रे आणि पुरावे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे दिल्याचेही बारस्कर यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्यासह पांडुरंग तारक, ईश्वर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम पुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तारक, बद्रीनाथ तारक, विलास खेडकर आणि इतर संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘हजार कोटींचा भ्रष्टाचार’ केल्याचा दावा
बारस्कर यांनी जरांगे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केलेल्या वाळू व्यवसायाचाही उल्लेख केला. या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या तक्रारीत किमान एक हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केल्याचे बारस्कर यांनी सांगितले.
तसेच संबंधित व्यक्तींच्या संपत्तीच्या स्रोतांची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर जमीन कशी खरेदी केली, महागड्या वाहनांचा खर्च कसा भागवला जातो आणि उपचारांसाठी होणाऱ्या मोठ्या खर्चाचा स्रोत काय आहे, असे प्रश्न उपस्थित करत या सर्व बाबींची चौकशी व्हावी, अशी मागणी बारस्कर यांनी केली.
ईडीच्या भूमिकेकडे लक्ष
या सर्व आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची चौकशी करून आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे शोधून काढावीत, अशी मागणी अजय बारस्कर यांनी केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असतानाच बारस्कर यांच्या तक्रारीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बारस्कर यांच्या तक्रारीची ईडीकडून नेमकी कशी दखल घेतली जाते, संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाते का आणि या आरोपांवर मनोज जरांगे यांची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App