विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेच्या उद्योगपतींचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत आता एकही भारतीय किंवा अमेरिकेबाहेरील उद्योगपती राहिलेला नाही. भारताचे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर फ्रान्सचे प्रसिद्ध उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट यांनाही टॉप-10 मधून बाहेर पडावे लागले आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत यंदा मोठी घट झाली आहे. त्यांच्या संपत्तीत तब्बल 64.9 अब्ज डॉलरची घट झाली असून त्यांची एकूण नेटवर्थ सध्या सुमारे 143 अब्ज डॉलर आहे. गुरुवारी त्यांच्या संपत्तीत आणखी 1.74 अब्ज डॉलरची घट झाली. त्यामुळे ते टॉप-10 मधून घसरून 11व्या स्थानावर पोहोचले आहेत.
अर्नाल्ट हे लक्झरी ब्रँड LVMH (Louis Vuitton Moët Hennessy) चे प्रमुख आहेत. यंदा त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 36 टक्क्यांची घसरण झाल्याचा परिणाम त्यांच्या संपत्तीवर झाला आहे. अंबानी आणि अदानी टॉप-10 मधून बाहेर गेल्यानंतर अर्नाल्ट हे अमेरिकेबाहेरील एकमेव उद्योगपती या यादीत होते. आता त्यांच्याही बाहेर पडल्याने टॉप-10 वर पूर्णपणे अमेरिकन अब्जाधीशांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
जगातील टॉप-10 अब्जाधीश कोण?
1. एलन मस्क टेस्ला आणि इतर कंपन्यांमुळे एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ सुमारे 919 अब्ज डॉलर असून यंदा त्यांच्या संपत्तीत तब्बल 299 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
2. लॅरी पेज गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांची नेटवर्थ सुमारे 286 अब्ज डॉलर आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 17 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
3. जेफ बेझोस अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती यंदा 20.4 अब्ज डॉलरने वाढून 274 अब्ज डॉलर झाली आहे.
4. सर्गेई ब्रिन गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांची नेटवर्थ 266 अब्ज डॉलर आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 15.9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
5. मायकेल डेल डेल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक मायकेल डेल यांची एकूण संपत्ती सुमारे 245 अब्ज डॉलर आहे.
6. मार्क झुकरबर्ग मेटाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग 229 अब्ज डॉलर नेटवर्थसह सहाव्या स्थानावर आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत सुमारे 4.54 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
7. लॅरी एलिसन ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांची नेटवर्थ सुमारे 208 अब्ज डॉलर आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 39.8 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
8. जेन्सेन हुआंग एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि CEO जेन्सेन हुआंग यांची संपत्ती सुमारे 181 अब्ज डॉलर आहे. यंदा त्यांच्या नेटवर्थमध्ये 26.4 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
9. स्टीव्ह बाल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी CEO स्टीव्ह बाल्मर 172 अब्ज डॉलर संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत 3.83 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
10. वॉरेन बफे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे 144 अब्ज डॉलर नेटवर्थसह टॉप-10 मध्ये दहाव्या क्रमांकावर आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत 7.23 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
अमेरिकेबाहेरील अब्जाधीशांचा टॉप-10 मधून सफाया
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर बर्नार्ड अर्नाल्ट हे अमेरिकेबाहेरील प्रमुख अब्जाधीश टॉप-10 मध्ये होते. मात्र, LVMHच्या शेअर्समधील घसरण आणि त्यांच्या संपत्तीत झालेल्या मोठ्या घटीनंतर तेही 11व्या स्थानावर गेले. त्यामुळे सध्याच्या टॉप-10 यादीत अमेरिकन अब्जाधीशांचे 100 टक्के वर्चस्व पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App