MPSC पेपरफुटीवर अखेर मोठा निर्णय? फडणवीसांनी विद्यार्थ्यांना दिलं ‘हे’ आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. तब्बल पावणेदोन तास चाललेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारापासून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुण आणि कथित पेपरफुटीपर्यंत विविध मुद्दे पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. MPSC paper leak case

बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दावा केला की, त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणांची फेरतपासणी करण्यासह कथित पेपरफुटी प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणात येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.

गुणांची फेरतपासणी करण्याची मागणी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणांबाबत विद्यार्थ्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या गुणांची फेरतपासणी करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. गुणांशी संबंधित मुद्द्यांवर दळवी समितीच्या माध्यमातून निर्णय घेतला जाणार असल्याचेही बैठकीनंतर सांगण्यात आले.

परीक्षेच्या पुढील टप्प्यातील मुलाखती पुढे ढकलण्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. परीक्षेशी संबंधित आक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी व्ही. राधा समितीसमोर मांडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

आरटीआयअंतर्गत कागदपत्रे मिळणार?

परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि पेपर आरटीआयअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक आश्वासन मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी परीक्षा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीही मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.



विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीअंती या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

कथित पेपरफुटीची SIT चौकशी

MPSC परीक्षा प्रक्रियेतील सर्वाधिक गंभीर ठरलेल्या कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची SITमार्फत चौकशी करण्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तपासात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली असली तरी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी अद्याप मागे घेतलेली नाही. आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केवळ आश्वासने पुरेशी नसून परीक्षा व्यवस्थेत धोरणात्मक आणि संस्थात्मक बदल आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून पारदर्शकता वाढविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

उपोषण मागे घेण्याबाबत निर्णय लवकरच

दरम्यान, आंदोलनाचा एक भाग म्हणून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे उपोषण मागे घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. त्यानंतर प्रतिनिधी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत.

मात्र, सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली नाहीत, तर पुन्हा आंदोलन करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा विद्यार्थी प्रतिनिधींनी केला.

CM Devendra Fadnavis assures SIT probe into MPSC paper leak case

हत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात