विशेष प्रतिनिधी
पुणे : महापालिकेत सत्ता आणि स्पष्ट बहुमत असूनही नगरसेवकांचीच कामे प्रशासनाकडून होत नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे काय, असा सवाल करत भाजप नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर बुधवारी जोरदार हल्लाबोल केला. कचरा, खड्डे, रस्ते, समाविष्ट गावांमधील कर आकारणी, रखडलेली विकासकामे, निधी, अधिकाऱ्यांची मनमानी आणि सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी न मिळणे अशा विविध मुद्द्यांवर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. Pune Municipal Corporation
“आपण प्रशासनाला प्रोटेक्ट करायला बसलो आहोत का?”, असा थेट सवालही काही नगरसेवकांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत केला. अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवून नगरसेवकांची आणि नागरिकांची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत बुधवारी भाजप नगरसेवकांची बैठक झाली. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रथमच या बैठकीला संबोधित केले. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील समस्या मांडतानाच महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. काही नगरसेवकांनी महापालिकेतील तीनही पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतही तक्रारी केल्याचे समजते.
समाविष्ट गावांमधील कर आकारणीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर महापालिकेने स्वतःहून तोडगा काढण्याची गरज असल्याची भूमिका नगरसेवकांनी मांडली. तीन-तीन वेळा नगरसेवक राहूनही समाविष्ट गावांतील लोकप्रतिनिधींना अपेक्षित वागणूक मिळत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. २४ मीटरच्या रस्त्यांमुळे वाढणारी वाहतूक कोंडी आणि रखडलेली विकासकामे याकडेही लक्ष वेधण्यात आले.
सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा मुद्दाही बैठकीत गाजला. एका नगरसेवकाने बोलत असताना आपला माईक मध्येच बंद केला जात असल्याचा आरोप केला. “मला बोलू दिले जात नाही, माझा माईक बंद केला जातो. प्रशासनावर अंकुश कुणाचा आहे?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अतिरिक्त आयुक्तांकडून नगरसेवकांशी अपेक्षित पद्धतीने संवाद साधला जात नसल्याची तक्रारही करण्यात आली. काही अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांशी दमबाजी केली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली.
कचरा संकलनाचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे नगरसेवकांनी बैठकीत सांगितले. कोथरूडमध्ये कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचऱ्याच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याची तक्रार करण्यात आली. प्रभाग कार्यालयांच्या पातळीवरही नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने प्रभाग समित्यांचे कामकाज अधिक सक्षम करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
“सभासदांची कामे होत नाहीत, खड्ड्यांचे प्रश्न कायम आहेत. पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरून कामे करावी लागत आहेत, तरीही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मग आपण प्रशासनाला प्रोटेक्ट करायला बसलो आहोत का?”, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला.
गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणासह विविध विषयांवर प्रत्येक नगरसेवक स्वतंत्रपणे भूमिका मांडत असल्याबद्दलही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या हिताचे प्रश्न पक्ष म्हणून एकत्रितपणे आणि ठामपणे मांडले जावेत, अशी मागणी करण्यात आली. “येत्या सर्वसाधारण सभेत कामे न करणाऱ्या एका तरी अधिकाऱ्यावर कारवाई करून दाखवा,” अशी मागणीही नगरसेवकांनी केली.
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. महापालिकेचे दवाखाने अस्तित्वात असतानाही शहरी गरीब योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार करण्यात आली. अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील महापालिका दवाखाने सक्षम करण्याची मागणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून कामे करून घ्या
रस्त्यांची दुरवस्था, प्रभागांतील रखडलेली विकासकामे आणि भूसंपादनाच्या अडचणी यावरूनही नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दर्जेदार विकासकामांसाठी प्रशासन आणि ठेकेदारांच्या लॉबीवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याची भूमिका काही नगरसेवकांनी मांडली.
महापालिकेत स्पष्ट बहुमत आणि पक्षाची एकजूट असताना नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद सत्ताधारी पक्षाकडे आहे, याकडेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. “आपले नेते सभागृहात आहेत. त्यांनी नगरसेवकांचे प्रश्न मार्गी लावावेत. अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून कामे करून घेतली पाहिजेत,” असा संतप्त सूर नगरसेवकांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App