विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीची सत्ता असतानाच आता दोन्ही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. अभय योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट) मनपा गटनेते अमेय घोले यांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणावर कारवाई झाली नाही तर “वेळ पडली तर सत्तेतून बाहेर पडू, सत्तेवर लाथ मारू”, असा थेट इशाराच त्यांनी दिला.
अभय योजनेत सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात अमेय घोले यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. त्यामुळे सत्ताधारी गटातील एका महत्त्वाच्या नेत्याने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमेय घोले म्हणाले की, शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी अभय योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना कमी खर्चात पात्र करून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या हक्काच्या घरासाठी पात्रता आणि निकषांच्या आधारे अनेक गरीब व होतकरू नागरिक महापालिकेकडे येत होते. मात्र, आता या योजनेत अक्षरशः ‘धंदा’ मांडण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला.
“जे रेंट कंट्रोलर आणि आरसी म्हणजेच कॉलनी ऑफिसर आहेत, ते नागरिकांकडून ५ ते १० लाख रुपये वसूल करत आहेत,” असा गंभीर आरोप घोले यांनी केला. गरीब नागरिकांकडून अशा पद्धतीने पैसे उकळले जात असतील तर हा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या विषयावर शिवसेनेच्या वतीने वारंवार स्थायी समितीत आवाज उठवण्यात आला. मात्र, दीड महिन्याहून अधिक काळ उलटूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे बुधवारी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडून त्यावर निर्णय होईपर्यंत सभात्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे घोले यांनी सांगितले.
“मराठी कुटुंबातील झोपडीधारक घरकाम करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी पाच-दहा लाख रुपये कुठून आणायचे?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गरीब नागरिकांच्या हक्काच्या घरासाठी फाईलची बोली लागत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
अमेय घोले यांनी पुढे स्पष्ट केले की, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना स्थायी समितीचा भाग होणार नाही. “आम्ही आधी शिवसैनिक आहोत. शिवसेनेने कधीही अन्याय सहन केला नाही. गोरगरिबांवर अन्याय होत असेल तर त्यापेक्षा आम्ही सभात्याग करू. आम्ही सत्तेवर लाथ मारू; पण गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता असताना सत्ताधारी पक्षातीलच एका नेत्याने थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने आगामी काळात या मुद्द्यावरून महायुतीतील अंतर्गत राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App