लंडनच्या संसदेत महाराष्ट्राचा डंका! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणेने सभागृह दणाणलं

Jai Maharashtra

विशेष प्रतिनिधी

लंडन : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनासाठी कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकाग्निशन या सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये “जय महाराष्ट्र”चा नारा घुमला.

शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून “नमस्कार, जय महाराष्ट्र” अशी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची विकासयात्रा, लोककल्याणकारी योजना आणि भारत-ब्रिटनमधील वाढते सहकार्य यावर भाष्य केले.

आपल्या आई आणि पत्नीने आयुष्यात केलेल्या संघर्षांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, त्यांच्या मेहनतीने आणि त्यागाने आपला दृष्टिकोन घडवला आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याची शिकवण दिली.

हा सन्मान UK Asian Business Council आणि Canvas for Care Creative Art Campus यांच्या वतीने देण्यात आला. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या योजनांचा, विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी या उपक्रमांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा आणि विश्वासाचा गौरव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील प्रशासन हे विकास आणि सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर केंद्रित असल्याचे स्पष्ट केले.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढले, तसेच कुटुंबाचे आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावरही सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला.

शासन आपल्या दारी या उपक्रमातून पाच कोटींहून अधिक नागरिकांना शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.‘विकास म्हणजे केवळ रस्ते आणि उंच इमारती नव्हेत’

शिंदे यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग, तृतीयपंथीयांसाठी धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत आणि गरजू नागरिकांना वैद्यकीय सहाय्य अशा विविध उपक्रमांचाही उल्लेख केला.

“विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल, मेट्रो किंवा उंच इमारती नव्हेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचविणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे, हाच खरा विकास आहे,” असे शिंदे म्हणाले.



2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

महाराष्ट्राला भारताचे औद्योगिक आणि आर्थिक शक्तिकेंद्र संबोधत शिंदे म्हणाले की, राज्याचा भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 14 टक्के वाटा असून देशात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येते.

त्यांनी वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई कोस्टल रोड यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख केला.तसेच 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य पुन्हा अधोरेखित केले.

ब्रिटिश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण

शिंदे यांनी ब्रिटनमधील उद्योग आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले.’हरित ऊर्जा, शाश्वत पायाभूत सुविधा, फिनटेक, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्य विकास ही भारत-ब्रिटन भविष्यातील सहकार्याची प्रमुख क्षेत्रे असू शकतात, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख “दूरदर्शी आणि गतिमान नेतृत्व” असा करत शिंदे म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर अधिक प्रभावी भूमिका बजावत आहे.

भारत आणि ब्रिटनमधील संबंध नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचे सांगत त्यांनी ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या 70 हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन नागरिकांना दोन्ही देशांना जोडणारा महत्त्वाचा मानवी दुवा म्हटले.

या कार्यक्रमाला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लीन फॉस्टर, UK Asian Business Councilचे अध्यक्ष अँड्र्यू ग्रोकॉक, उपाध्यक्ष सुदीप सकल, तसेच ब्रिटनमधील खासदार, मंत्री, महापौर, राजनैतिक अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Maharashtra makes waves in the London Parliament! The House resounded with the chant of ‘Jai Maharashtra’.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात