मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, फळबागांसाठी बोअरवेल खोलीकरणावरील बंदी 15 डिसेंबरपर्यंत उठवली

विशेष प्रतिनिधी

नागपूर: दुष्काळाच्या छायेत होरपळणाऱ्या राज्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. फळबागांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोलीकरणावरील बंदी सशर्त उठवण्यात आली असून, बोअरवेलच्या फ्लशिंगला कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची मोठी घोषणाही फडणवीस यांनी केली आहे. Fadnavis Announces

काल रात्री शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी सारवलेल्या अंगणात खाली बसून साधेपणाने दिवाळी साजरी केल्यानंतर आणि रात्रभर तिथे मुक्काम केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकरी व सरपंचांच्या निवेदनांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

फळबागा जगवण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोलीकरणाची मुभा; प्रशासनाची राहणार करडी नजर!

फळबागांवर आलेले संकट आणि भूजल पातळीचे नियोजन यावर सविस्तर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 10 ते 12 वर्षांची मेहनत वाया जाऊ नये: “सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत आपण जर फळबागा वाचवल्या नाहीत, तर ही फळझाडे पुन्हा आजच्या स्तरावर येण्यासाठी किमान 10 ते 12 वर्षे लागतात. त्यामुळे ज्या भागांत ही बंदी उठवणे शक्य आहे, तिथे केवळ फळबागा वाचवण्यासाठी विशेष बाब म्हणून आम्ही 15 डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोलीकरणावरील बंदी उठवत आहोत.”

सरसकट परवानगी नाही, परवानगी बंधनकारक

“ही बंदी सरसकट उठवली जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष फळबागा आहेत, त्यांनाच अधिकृत परवानगी घेऊन खोलीकरण करता येईल. आपल्याला भूगर्भातील पाणी पुढील मे महिन्यापर्यंत पुरवायचे असल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर राहील.”



फ्लशिंगला कायमस्वरूपी परवानगी

नवीन बोअरवेल आणि फ्लशिंगबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बोअरवेल फ्लशिंगला कायमस्वरूपी परवानगी आहे. फ्लशिंग कधीही करता येते, त्यावर कोणतीही बंदी नाही. केवळ खोलीकरणावर असलेली बंदी आपण तात्पुरती आणि सशर्त उठवली आहे.”

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी 15,000 कोटींचा निधी

1980 पासून रखडलेले खार आणि खोरी यांसारखे सिंचन प्रकल्प हेच महाराष्ट्रातील दुष्काळाचे मूळ कारण आहे का, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ठोस उत्तर दिले. “वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प हे दुष्काळाचे नक्कीच एक प्रमुख कारण आहे. मी यापूर्वी मुख्यमंत्री असताना गेल्या पंचवार्षिक काळात आपण तब्बल 97 प्रकल्प पूर्ण केले होते. आता उर्वरित प्रकल्पांनाही निधी उपलब्ध करून दिला आहे.”

विदर्भ-मराठवाड्याला मोठा फायदा

“ज्या प्रकल्पांचे केवळ शेवटचे काम बाकी आहे, ते तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार 15,000 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन निधी देत आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील लहान-मोठे प्रकल्प मार्गी लागून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.”

सरपंच आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक निवेदनावर सकारात्मक कारवाई करणार

काल रात्री शेतकऱ्यांशी आणि आज तालुक्यातील सर्व सरपंचांशी केलेल्या सविस्तर चर्चेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, सर्व प्रश्न शांतपणे ऐकून घेतले: “काल रात्री आणि आज सरपंच व शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने शेती, रस्ते, पाणंद रस्ते आणि तलावांचे प्रश्न मांडले. आम्ही कोणालाही न अडवता प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आहे. यातील अनेक प्रश्नांच्या योजना यापूर्वीच घोषित झाल्या असून काहींना पालकमंत्री व आमदारांनी मान्यता दिली आहे. आलेल्या सर्व निवेदनांवर आणि चांगल्या सूचनांवर तातडीने कारवाई करून बळीराजाला जास्तीत जास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

Fadnavis Announces Relief for Farmers; Borewell Deepening Ban Lifted Till December 15

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात