मी 8-9 तारखेला गोंदियात असल्याने शरद पवारांना ’10 तारखेनंतर भेटू’ असे बोललो; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना प्रफुल पटेलांचा पूर्णविराम

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी, 6 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यानच्या संवादाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि त्यात ’10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू’ असे वाक्य ऐकू आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना मोठे उधाण आले होते. Praful Patel

मात्र, आता खुद्द प्रफुल पटेल यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर स्पष्टीकरण देत विलीनीकरणाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. “पवार साहेबांची प्रकृती ठीक नसताना रुग्णालयात कोणती राजकीय चर्चा करणार? मी दिवाळीनिमित्त 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी गोंदियामध्ये असल्याने 10 तारखेनंतर मुंबईत परतल्यावर घरी येऊन भेटू, असा तो सहज संवाद होता; कृपया त्याचा भलता राजकीय अर्थ काढू नका,” असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच रुग्णालयात गेलो होतो

ब्रीच कँडी रुग्णालयातील भेटीबाबत पसरलेल्या अफवांवर बोलताना प्रफुल पटेल यांनी वस्तुस्थिती मांडली. “शरद पवार साहेब वैद्यकीय तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत. त्यामुळे केवळ त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मी शुक्रवारी, 6 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात गेलो होतो.”

इकडच्या-तिकडच्या सहज गप्पा

“आमची भेट अतिशय चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली. नेहमीप्रमाणे इकडच्या-तिकडच्या काही कौटुंबिक व सामान्य गोष्टींवर चर्चा झाली; मात्र त्यात कोणतीही विशेष राजकीय चर्चा नव्हती. ईश्वराच्या कृपेने आता त्यांची प्रकृती सुधारली असून ते घरी परतले आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.”

’10 तारखेनंतर भेटू’ या संवादामागील नेमके सत्य काय?

व्हिडिओमध्ये शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात 10 नोव्हेंबरनंतर भेटण्याबाबत झालेल्या संवादाचे गूढ पटेल यांनी उलगडले. “दिवाळीच्या सणामुळे मी 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी माझ्या गोंदिया मतदारसंघात असणार आहे, याची कल्पना शरद पवार साहेबांनाही होती. त्यामुळेच मी 10 तारखेनंतर मुंबईत परत आल्यानंतर पुन्हा भेटू, असे त्यांना सांगितले होते.”



रुग्णालयात सविस्तर बोलणे उचित नव्हते

“तेव्हा साहेब रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिथे कोणत्याही विषयावर सविस्तर बोलणे योग्य नव्हते. म्हणूनच ‘रुग्णालयात नको, तर तुम्ही घरी परतल्यानंतर आणि मी गोंदिया दौरा आटोपून मुंबईत आल्यानंतर तुमच्या घरी येऊन भेटण्याचा प्रयत्न करेन,’ असा आमचा संवाद झाला होता. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही,” असे पटेल यांनी ठामपणे सांगितले.

पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

दिवाळीनिमित्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना प्रफुल पटेल यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. “यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या कठीण संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.”

धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार

“महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना जास्तीत जास्त मदत व दिलासा मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही प्रफुल पटेल यांनी दिली.

Praful Patel Ends NCP Merger Speculation, Clarifies ‘Meet After November 10’ Remark

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात