विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केल्यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे. विशेषतः या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुमचे आशीर्वाद असू द्या,” असे म्हटल्याची माहिती पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिल्यामुळे भाजप आणि पवार कुटुंबाच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “एखादी व्यक्ती आजारी असताना तिच्या प्रकृतीची विचारपूस करणे हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग असतो; त्यामुळे मोदींच्या फोनचा वेगळा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याच वेळी “शरद पवारांची राष्ट्रवादी भविष्यात भाजपसोबत जाणार का?” या थेट प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळत सूचक मौन पाळल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. Prithviraj Chavan
एका वृत्तसमूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी-पवार संवाद, इंडिया आघाडीची एकजूट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील भूमिकेवर भाष्य केले.
तुम्ही आता जास्त दगदग करू नका, आम्ही बघतो -पृथ्वीराज चव्हाण
पंतप्रधान मोदींच्या फोनचे राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी सबुरीचा सल्ला दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, ही केवळ शिष्टाचाराची आणि चौकशीची बाब आहे. एखादी व्यक्ती आजारी असताना तिची चौकशी करणे हा आपला सामाजिक शिष्टाचार आहे.”
विधानाचा चुकीचा अर्थ नको
“विठ्ठल मणियार यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी यांनी ‘सुप्रिया सुळे आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आता जास्त दगदग करू नका’ अशा आशयाचे जे वक्तव्य केले, त्यातून केवळ तब्येतीची काळजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या संवादाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक उत्तर
एकिकडे फोनला शिष्टाचार म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजकीय निष्ठेबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. मुलाखतीत चव्हाण यांना विचारण्यात आले की, “शरद पवार यांचा पक्ष काँग्रेससोबत ठामपणे राहील का? या पक्षाच्या भूमिकेबाबत तुम्हाला काही शंका आहे का? तसेच भविष्यात हा पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे का?” या थेट प्रश्नावर भाष्य करणे टाळत चव्हाण म्हणाले की, “या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो; मात्र ती देणार नाही.”
राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण
पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नावर स्पष्ट नकार देण्याऐवजी “उत्तर देणार नाही” असे सूचक विधान केल्यामुळे, शरद पवार यांच्या पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
इंडिया आघाडीच्या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व
सध्या राष्ट्रीय राजकारणात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात इंडिया आघाडीतील (INDIA Bloc) सर्व विरोधी पक्ष एकवटत आहेत. अशा संवेदनशील राजकीय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन करणे आणि त्यात सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करणे, याकडे राजकीय निरीक्षक बारकाईने पाहत आहेत. एकीकडे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी ‘शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत’ अशी ठाम ग्वाही दिली असताना, पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर मौन पाळल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गूढ आणखी वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App