तीन लग्न, तीन घटस्फोट! आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा तिसरा संसारही मोडला

Pawan Kalyan

विशेष प्रतिनिधी

रशियन मॉडेल अ‍ॅना कोनिडेलासोबत १३ वर्षांचा संसार संपुष्टात; परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय, पहिल्या पत्नीनेही केले होते गंभीर आरोप

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पवन कल्याण यांचा तिसरा विवाहही संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे. रशियन मॉडेल अ‍ॅना लेझनेवा (अ‍ॅना कोनिडेला) यांच्यासोबतचा तब्बल १३ वर्षांचा संसार आता संपला आहे. दोघांनीही परस्पर सामंजस्य आणि आदराने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनातून स्पष्ट केले आहे.

पवन कल्याण यांनी अभिनयासोबतच राजकारणातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन निवडणुकांमधील पराभवानंतर त्यांनी पिठापुरम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेचा विषय राहिले आहे.

पहिल्या पत्नीने केले होते गंभीर आरोप

पवन कल्याण यांनी १९९७ मध्ये नंदिनी यांच्याशी पहिला विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. २००१ पासून दोघेही वेगळे राहत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर २००७ मध्ये नंदिनी यांनी पवन कल्याण यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. विवाहित असतानाच त्यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी लग्न केल्याचा आरोप नंदिनी यांनी केला होता.

या प्रकरणात पवन कल्याण यांनी आपण रेणू देसाई यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे मान्य केले होते. अखेर २००८ मध्ये पवन कल्याण आणि नंदिनी यांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीला नुकसानभरपाई म्हणून पवन कल्याण यांना पाच कोटी रुपये द्यावे लागल्याचे वृत्त आहे.

दुसरा विवाहही फार काळ टिकला नाही

पहिल्या घटस्फोटानंतर २००९ मध्ये पवन कल्याण यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी विवाह केला. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्यही फार काळ टिकले नाही. लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांनंतर म्हणजेच २०१२ मध्ये दोघे विभक्त झाले. या दाम्पत्याला अकिरा नंदन आणि आद्या अशी दोन मुले आहेत.

रशियन मॉडेलसोबतचा तिसरा संसारही संपला

यानंतर २०१३ मध्ये पवन कल्याण यांनी रशियन मॉडेल अ‍ॅना लेझनेवा यांच्याशी तिसरा विवाह केला. तब्बल १३ वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता या नात्यालाही पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

विभक्त होण्याबाबतच्या निवेदनात दोघांनीही मुलांच्या आनंदाला आणि भवितव्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विवाह संपुष्टात आला असला तरी चांगले मित्र आणि मुलांचे जबाबदार पालक म्हणून कायम राहू, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

अशा प्रकारे पवन कल्याण यांच्या तीनही विवाहांचा शेवट घटस्फोटात झाल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Pawan Kalyan’s third marriage has also fallen apart.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात