विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक आणि सडेतोड कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. विशेषतः अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवायांमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. अशातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील तुकाराम मुंढेंबाबतच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.
काय म्हणाले समीर वानखेडे?
माध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांना तुकाराम मुंढे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याबाबत वैयक्तिक टिप्पणी करण्यास नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली.
“मी काही अधिकाऱ्यांविषयी खासगी बोलणार नाही. आम्ही जे काम करतो, ते आमच्या जबाबदारीचा भाग आहे. तुम्ही ज्यांचं नाव घेत आहात, ते अधिकारीही चौकटीबाहेर जाऊन काही करत नाहीत. राष्ट्राप्रती आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आम्हाला पगार मिळतो. त्यामुळे सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोणी काही फार ग्रेट किंवा असाधारण काम करत नाही,” असा आशय त्यांच्या वक्तव्याचा होता.
ड्रग्जच्या समस्येचा सामना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. “ड्रग्जचा मुद्दा आमच्यासमोर आहे. त्याला सामोरे जाऊन ते थांबवावे लागेल. अन्यथा त्याचा परिणाम नव्या पिढीवर आणि तरुणांवर होईल,” असे वानखेडे यांनी म्हटले.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तुकाराम मुंढेंना पाठिंबा
वानखेडे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या, तरी अनेकांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले आहे.
एका यूजरने, “ते ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्याच पद्धतीने काम झाले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया दिली. तर अन्य एका यूजरने तुकाराम मुंढे यांना “सर्वात प्रामाणिक अधिकारी” म्हटले. आणखी एका नेटकऱ्याने, “ते भ्रष्ट अधिकारी नाहीत. त्यांना आमचा सलाम,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
२१ वर्षांच्या सेवेत २५ वेळा बदली
तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या बदल्यांचा इतिहासही कायम चर्चेचा विषय राहिला आहे. सुमारे २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांची तब्बल २५ वेळा बदली झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कारकिर्दीतील हा आकडा त्यांच्या कडक आणि धडाडीच्या कार्यशैलीइतकाच चर्चेत राहिला आहे.
दरम्यान, सध्या अन्न व औषध प्रशासनातील कारवायांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत असतानाच समीर वानखेडेंच्या वक्तव्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App