विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या सोयीसाठी मुंबईतील विविध रस्त्यांवर मारण्यात आलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दादर पाठोपाठ आता गिरगाव आणि घाटकोपरमध्येही मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पट्ट्यांवर काळा रंग फासण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट शब्दांत भाष्य केले असून, “प्रत्येक गोष्टीला वादात ओढून राजकारण केल्याने कधीच मते मिळत नाहीत,” असा सणसणीत टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधला असता, सदर वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणत्याही राजकीय फायद्यासाठी दोन समाजांना एकमेकांसमोर उभे करणे आणि त्यांच्यात तेढ निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे.”CM Devendra Fadnavis
“एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल, तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे आणि इतर समाजानेही त्यांच्या परंपरेचा आदर राखला पाहिजे. त्याचप्रमाणे, ज्यांची ती परंपरा आहे, त्यांनी इतर समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेत त्यांचा आदर केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चर्चेत राहण्यासाठी सुरू असलेल्या स्टंटला उत्तर देणार नाही
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर नाव न घेता निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, “विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादात ढकलून त्यामध्ये राजकारण ओतल्याने कुणाचाही फायदा होत नाही, आणि त्यातून कधीच मतेही मिळत नाहीत. अनेक जण केवळ चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्यांच्या अशा प्रत्येक गोष्टीला मी बोललंच पाहिजे आणि प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, असे अजिबात नाही.”
नेमका वाद काय?
जैन समाजातील धर्मगुरू आणि साध्वी नेहमी अनवाणी पायांनी पायी प्रवास करतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने डांबरी रस्त्यावरून चालताना त्यांच्या पायाला चटके बसून त्रास होऊ नये, यासाठी घाटकोपर, दादर आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर या पांढऱ्या पट्ट्या रंगवण्यात आल्याचा दावा जैन समाजातील काही सदस्यांनी केला आहे. घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी रंगवलेल्या पांढऱ्या पट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वादाला तोंड फुटले.
गिरगावात मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांना पोलिसांचा अटकाव
काल दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेला या पट्ट्या पुसण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आज गिरगावमध्येही हा वाद उफाळून आला. गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांवर थेट काळा रंग मारून निषेध नोंदवला. या आंदोलनाची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनसे आणि ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App