नाशिक : रोहित पवारांनी पंढरपूर मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केले खरे पण त्याचा सरकारवर दुष्परिणाम व्हायच्या ऐवजी त्यांच्यावरच “रिव्हर्स इफेक्ट” झाला. रोहित पवारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची संधी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली.Mahayuti leaders targets Sharad Pawar over Rohit Pawar’s agitation
एरवी आधीचे राजकीय अनुभव लक्षात घेऊन भाजपचे नेते बचावात्मक पवित्र्यात राहून शरद पवारांविषयी बोलत होते. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किंवा भाजपच्या नेत्यांवर टीका केली, तरी त्याकडे दुर्लक्ष करत होते किंवा त्यांना सौम्य भाषेत प्रत्युत्तरे देत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील वगैरे नेत्यांनी संयम बाळगला होता. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांच्या तोंडाला भाजपच्या नेत्यांनी काहीसा लगाम घातला होता.
– रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन
पण फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि त्यानंतर रोहित पवार पंढरपूरला जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करायला बसले. त्याबरोबर भाजपच्या सगळ्याच नेत्यांना चेव आला. भाजपच्या सगळ्या नेत्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाचे वाभाडे काढलेच, पण त्याचबरोबर शरद पवारांना ठोकून काढायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
– रोहित पवारांना धू धू धुतले
रोहित पवारांच्या आंदोलनाविषयी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सहानुभूती दाखविली, पण महायुतीच्या बाकीच्या सगळ्या नेत्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवून दिली. गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन या सगळ्या मंत्र्यांनी रोहित पवारांना धू धू धुतले. गोपीचंद पडळकर आणि गिरीश महाजन हे तर डायरेक्ट शरद पवारांवरच बरसले. रोहित पवारांना महिना – दोन महिने अन्नत्याग आंदोलन करू द्या. पोलिसांनी त्यांना एकही घास खायला देऊ नये. रोहित पवारांनी आणि त्यांच्या आजोबांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे खळे लुटून खाल्ले आणि आता त्यांना अन्नत्याग आंदोलन करायचे सूचतंय, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी हाणला.
– गिरीश महाजनांची थेट पवारांवर टीका
गिरीश महाजन तर पडळकर यांच्या पुढे गेले. रोहित पवारांच्या आंदोलनाला कुठलाही अर्थ नाही. त्यांना फक्त टीआरपी घ्यायचा असतो. रोज चॅनेलवर दिसायचं असतं. आपण काहीतरी केलं याचं क्रेडिट रोहित पवारांना घ्यायचा आहे. पण त्यांनी आपल्या आजोबांना विचारावं त्यांचं सरकार असताना शेतकऱ्यांना काही देण्यासाठी त्यांनी काय बोंब पाडली!! आंदोलनाला फक्त एक दिवस झाला, तर हे झोपून गेले. आम्ही देखील बारा – बारा दिवस उपोषण केले होते. रोहित पवारांचे सगळे नाटक लोकांना दिसते आणि समजते. लोक रोहित पवारांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, अशा परखड शब्दांमध्ये गिरीश महाजन यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांचे वाभाडे काढले.
रोहित पवारांच्या आंदोलनामुळे त्यांना सहानुभूती मिळायाचे सोडाच, उलट सगळ्या पवार खानदानाला ठोकून काढायची संधी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना मिळाली आणि ती त्यांनी चांगलीच साधून घेतली. रोहित पवारांच्या आंदोलनाचा हा “रिव्हर्स इफेक्ट” ठरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App