विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामु्ळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.Chhagan Bhujbal
मध्यपूर्वेत अमेरिका व इस्त्रायलने इराण विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. पण होर्मुझची सामुद्रधुणी बंद असल्यामुळे येथून होणारी इंधनाची वाहतूक ठप्प पडली आहे. परिणामी, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनासाठी लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी हाणामारीचेही प्रकार घडलेत. या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना मंत्री छगन भुजबळ यांनी उपलब्ध साठ्याची उपरोक्त माहिती दिली आहे.Chhagan Bhujbal
केरोसीन वाटपाची साखळी तुटली
छगन भुजबळ म्हणाले, सरकारकडे सध्या केवळ 1 महिना पुरेल एवढाच पेट्रोल – डिझेलचा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल – डिझेलची चिंता असली तरी राज्याकडे केरोसिनचा (रॉकेल) मुबलक साठा आहे. पण केरोसीन वाटपाची जी साखळी होती, ती आता पूर्णपणे तुटली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी व वाटप सुरुळीत करण्यासाठी काही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः ही पुरवठा साखळी पूर्ववत करण्यासाठी आता केरोसीन वाटपाची विनामूल्य परवानगी दिली जाईल.
मोदींचा स्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न
भुजबळ म्हणाले, इंधन टंचाईचा प्रश्न हा केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही. हा एक जागतिक प्रश्न बनला आहे. इराण, अमेरिका व इतर देशांमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद व राजकीय घडामोडींमुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा फटका युरोपपासून जपानपर्यंत व अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही बसला आहे. तिथेही पेट्रोल – डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. इंधनाची आवक सुरुळीत ठेवण्यासाठी ते अनेक नव्या देशांशी संपर्क साधून चर्चा करत आहेत.
जागतिक इंधन संकट मोठे आहे. त्यामुळे आपल्यालाही थोडी अडचण सहन करावी लागेल. पण इतर देशांच्या तुलनेत सध्यातरी भारताची परिस्थिती अत्यंत चांगली व नियंत्रणात आहे.
पीएनजी पाईपलाईन असलेल्या भागातील नागरिकांना इशारा
छगन भुजबळ यांनी यावेळी पीएनजी गॅस पाईपलाईन झालेल्या भागातील नागरिकांना 30 जूनपूर्वी जोडणी करण्याचा अर्ज करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट् केले. ज्या – ज्या भागात पीएनजी गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे किंवा कंपन्या पाईपलाईन जोडणीचे काम करत आहेत, त्या भागातील नागरिकांनी 30 जूनपूर्वी जोडणीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यांनी या मुदतीत अर्ज केला नाही, तर त्यांचे एलपीजी सिलिंडर बंद केले जाईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन स्थिती स्पष्ट करावी
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या विधानावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुलासाही मागितला आहे. त्या म्हणाल्या, राज्यभरात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे पंपावर रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे देखील वृत्त आहे. राज्यात सर्वत्र इंधनटंचाईमुळे जनता त्रस्त असताना शासनाने केवळ एक महिना पुरेल एवढेच इंधन असल्याचे स्पष्ट केले आहे.
या एक महिन्यानंतर काय परिस्थिती असणार आहे ? ही परिस्थिती कायम राहील की इंधन उपलब्ध करुन दिले जाईल याबाबत काहीच स्पष्टता येत नाही. जनतेमध्ये संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण आहे, नेमकं काय सुरु आहे याबाबत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी पुढे येऊन खुलासा केला पाहिजे.
मोदींनी जनतेला महागाई, टंचाईची मिरची दिली – वडेट्टीवार
दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील इंधन टंचाईवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मोदीजी, इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट आणि भारतीयांना गाजर, हे काय पटलं नाही आम्हाला! देशातील जनतेला महागाईची, टंचाईची मिरची देऊन मोदीजी इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट देत आहेत. एक चॉकलेट त्या 22 लाख विद्यार्थ्यांना द्या, ज्यांचं स्वप्न NEET पेपरफुटीने धुळीस मिळवलं.
सातबारा कोरा करण्याचे आश्वासन ऐकून फसलेल्या आमच्या शेतकऱ्यांनाही एक चॉकलेट द्या. आज पेट्रोल डिझेल साठी रांगेत उभ्या असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनाही एक चॉकलेट द्या. मोदीजी… भारतीय नागरिकांना किती दिवस तुम्ही गाजर देणार? लवकर भारतात या देश तुमची वाट पाहतोय, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App