विशेष प्रतिनिधी
नाशिक : Girish Mahajan राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी दरड कोसळणे, झाड कोसळणे तसेच मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना यामुळे सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला आहे. या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Girish Mahajan
गिरीश महाजन म्हणाले, आपण सध्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिर बंद ठेवले आहेत. त्या ठिकाणी पर्यटनासाठी येऊ नका, धबधबे बघायला जाऊ नका, असे मी आवाहन करेल. तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘आमचे आंदोलन मागे घेण्यासाठी ढगफुटीची अफवा पसरवण्यात आली’, असे म्हटले होते. यावर महाजन उपरोधक टीका करत म्हणतात की, हो बरोबर आहे. आम्हीच ढगफुटी केली. आम्हीच जे पाणी वर पाठवले होते ते खाली आहे. मला यांच्या डोक्याची कीव करावी वाटते. आपण काय बोलतो काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीवरून आपण जात आहोत. इतक्या वर्षात इतक्या कमी वेळात उच्चांक पाऊस झालेला आहे. मला वाटते त्यांना थोडे भान राहिले पाहिजे. जवळपास 6-7 जिल्हे जलमय झाले आहेत. कॉंग्रेसकडून तसेही काही अपेक्षा नाही आणि अशा लोकांकडून कॉंग्रेस रसातळाला चालली आहे.Girish Mahajan
गिरीश महाजन यांची गाडी चिखलात अडकली
गिरीश महाजन काल रात्रीपासूनच पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. आज त्यांची गाडी चिखलात अडकल्याचेही पाहायला मिळाले. यावर बोलताना महाजन म्हणाले, माझी गाडी लगेच निघाली होती. पण आमच्यासोबत जी पोलिसांची गाडी असते, ती त्या ठिकाणी अडकली होती. त्यानंतर मी माझ्या गाडीतून उतरलो आणि त्यांच्या चालकाला खाली उतरवले आणि मी त्यांच्या गाडीत बसून 2-3 मिनिटांत गाडी चिखलातून बाहेर काढली.
मिसिंग लिंकवर होणाऱ्या टीकेला महाजनांचे प्रत्युत्तर
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नव्यानेच सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर काल दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, आता मला सांगा इथे मिसिंग लिंक संपते आणि पुढे डोंगरावरून खाली पाणी आले, याच्यात मिसिंग लिंक खराब आहे का? इथे भ्रष्टाचार झाला आहे का? मला काही लोकांची खरेच कीव करावी वाटते. फक्त राजकारणच करायचे हे जरा डोक्यातून काढून टाकले पाहिजे.
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, लोक अडचणीत आहेत, लोक अडकले आहेत. राज्यात केवढा पाऊस सुरू आहे. गावच्यागाव जलमय झाली आहेत. आणि आपल्याला फक्त राजकारणच करायचे आहे. त्या टनेलमध्ये काहीच झालेले नाही. त्यातून बाहेर आल्यानंतर डोंगरावरून खाली पाणी आले आहे आणि लँड स्लायडिंग झाले. लँड स्लायडिंग अनेक ठिकाणी झाले आहे कारण पाऊसच एवढा पडला आहे. महिनाभर पडणारा पाऊस 3 दिवसांत पडतो आहे, तर काय होणार अजून? त्यामुळे मला असे वाटते की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. पण जेव्हा राज्य अडचणीत आहे तेव्हा एकत्र येऊन मदत करा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App