सूर्यकुमार आला, आवाज घुमला अन् गोविंदांचा जोश शिगेला! मराठीत भन्नाट डायलॉग; म्हणाला, ‘इतिहास घडवायचा असेल तर..

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  : ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने गोविंदांचा जोश आणखी वाढला. वर्तकनगर येथील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी सोहळ्याला सूर्यकुमारने हजेरी लावली. मंचावर येताच त्याने मराठीत संवाद साधत उपस्थितांचा उत्साह वाढवला.

ठाण्यात आज दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘ढाक्कुमाकुम… ढाक्कुमाकुम…’च्या तालावर गोविंदा पथके मानवी मनोरे रचण्यासाठी सज्ज झाली आहेत. टेंभी नाका, तलावपाळी, वर्तकनगर, रघुनाथनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड परिसरात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल-ताशांच्या गजराने आणि गोविंदा पथकांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

वर्तकनगरची दहीहंडी ठरली आकर्षण

प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथे आयोजित करण्यात आलेली दहीहंडी यंदा विशेष चर्चेत आहे. या सोहळ्यात अभिजात आणि समृद्ध मराठी भाषेचा गौरव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तर १० थर रचणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. विविध थरांसाठीही बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, गोविंदा पथकांमध्ये विक्रम मोडण्याची चुरस पाहायला मिळत आहे.



सूर्यकुमार यादवची एन्ट्री अन् गोविंदांचा उत्साह दुप्पट

दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने कार्यक्रमात आणखी रंगत आली. मंचावर येताच सूर्यकुमारने आपल्या खास अंदाजात ठाणेकरांना आवाज वाढवण्याचे आवाहन केले.

“कसं काय ठाणे? आवाज येत नाही तुमचा… जोरात आवाज झाला पाहिजे,” असं म्हणत त्याने उपस्थितांचा उत्साह वाढवला. यावेळी त्याने आपल्याला दहीहंडी सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल प्रताप सरनाईक यांचे आभारही मानले.

‘प्रो गोविंदा’ला ऑलिम्पिकमध्ये नेण्याचं लक्ष्य!

सूर्यकुमार यादवने दहीहंडी आणि गोविंदा या पारंपरिक खेळाला क्रीडा क्षेत्राशी जोडत मोठं लक्ष्य समोर ठेवलं. “आपला ‘प्रो गोविंदा’ झाला, हा आपला देशी स्पोर्ट्स आहे. या स्पोर्ट्सला आपल्याला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचं आहे. यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल,” असं तो म्हणाला.

क्रिकेटमधील आपल्या अनुभवाचा दाखला देत सूर्यकुमारने गोविंदांना मोठं स्वप्न पाहण्याचा आणि त्यासाठी झोकून देऊन मेहनत करण्याचा संदेश दिला.

“आमच्या क्रिकेटमध्ये आम्ही बोलतो, वेड लागलं पाहिजे… कारण इतिहास घडवायचा असेल, तर वेड लागलेच पाहिजे,” असं सूर्यकुमारने म्हटलं.

सूर्यकुमारच्या या जोशपूर्ण वक्तव्याने उपस्थित गोविंदा पथकांमध्ये उत्साह संचारला. पारंपरिक दहीहंडीला क्रीडा आणि ऑलिम्पिकच्या व्यासपीठाशी जोडण्याचा त्याचा संदेशही विशेष चर्चेत आला आहे.

Suryakumar Yadav Dahi Handi 2026 Video

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात