सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची चोरी; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या वादानंतर आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.

मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मंदिराच्या विश्वस्तांनी पाठविल्याचा दावा केलेले पत्र वाचून दाखविले. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे मंदिर प्रशासन, विश्वस्त आणि संबंधित यंत्रणांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, या प्रकरणात एका व्यक्तीला अटक झाली असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. मात्र, दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची चोरी एकट्या व्यक्तीकडून होणे शक्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, पोलिसांनी नोंदविलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) अवघ्या 10 हजार रुपयांच्या चोरीचा उल्लेख असल्याने या तपासाच्या दिशेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.



सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीचा मुद्दा यापूर्वी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला होता. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील एफआयआरचा उल्लेख करत तत्कालीन प्रशासनावर निशाणा साधला होता. अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील प्रकरणाचा संदर्भ दिला होता.

या प्रकरणी 20 मार्च 2026 रोजी नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनुसार, मंदिरातील कामगार राजेंद्र रामचंद्र पेंडुरकर याच्यावर पुजारी कक्षात ठेवलेल्या आरतीच्या दानपेटीतून 10 हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याच्यासह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांनी विश्वस्तांच्या पत्राचा हवाला देत सुमारे 18 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा उल्लेख केला. अशा परिस्थितीत पोलिसांकडे केवळ 10 हजार रुपयांच्या चोरीचीच नोंद कशी झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात मंदिर प्रशासन, विश्वस्त आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

दरम्यान, या विषयावर विधिमंडळात चर्चा सुरू झाल्यानंतर मंदिराच्या दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेत लक्षणीय वाढ झाल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी दरमहा सुमारे 40 ते 45 लाख रुपये जमा होत असताना, गेल्या महिनाभरात ही रक्कम 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यापूर्वीच्या दान संकलन प्रक्रियेबाबत आणि कथित गैरव्यवहाराबाबत पारदर्शक चौकशीची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.

मात्र, राज ठाकरे यांनी केलेल्या 18 कोटी रुपयांच्या कथित चोरीच्या आरोपांबाबत संबंधित मंदिर न्यास किंवा पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Raj Thackeray claims 18 crore siphoned off annually from Siddhivinayak temple

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात