विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त कार्यक्रम नसून ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ असल्याचा आरोप केला आहे.Rahul Gandhi
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी शुक्रवारी रात्री एनएसयू आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता भाजपने राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी दावा केला की, राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर देण्यात आली आहे. या संदर्भातील काही व्हिडीओही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्याचे सांगितले.
“राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात छात्रांची गूंज नाही, तर पैशांची गूंज आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला लोक उत्स्फूर्तपणे येत नसल्याने पैसे देऊन गर्दी जमवली जात आहे,” असा आरोप बन यांनी केला.
काँग्रेसचे नवे ‘पीपीपी मॉडेल’ म्हणजेच ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. कार्यक्रमासाठी पैसे देऊन गर्दी आणि समाजमाध्यमांवर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सुमारे ३ हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्यात येत असतील, तर त्यासाठी अंदाजे ९ ते १० कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो, असा दावा नवनाथ बन यांनी केला. राहुल गांधींना राजकीयदृष्ट्या पुन्हा चर्चेत आणण्यासाठी गर्दी जमवण्यावरच कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची सरकारने चौकशी करावी आणि या कथित आर्थिक व्यवहारामागे नेमका कोणाचा हात आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App