विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
नवीन रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणातील कुटुंबांना सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
या नव्या रेल्वे सेवेला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानण्यात आले आहेत.
‘या’ स्थानकांवर मिळणार थांबा
CSMT ते सावंतवाडी रोडदरम्यान धावणाऱ्या या रेल्वेला मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांचा समावेश आहे.
गणेशोत्सवात लाखो प्रवाशांना फायदा
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वे गाड्यांवरील गर्दी आणि तिकीटांची मागणीही वाढते. अशा परिस्थितीत CSMT-सावंतवाडी रोड दरम्यानची दैनिक रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबईपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीपर्यंतच्या प्रवाशांसाठी ही सेवा विशेष महत्त्वाची ठरणार असून, कोकण रेल्वे मार्गावरील दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App