विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताच्या फिनटेक क्षेत्राने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता डिजिटल पेमेंट्सच्या पुढे जात क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या यशोगाथेचा पुढील अध्याय हा फिनटेक क्षेत्रातील नव्या पिढीच्या नवोन्मेषावर आधारित असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
मुंबईतील बीकेसी येथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, ग्लोबल फिनटेक फेस्टचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन यांच्यासह देश-विदेशातील फिनटेक क्षेत्रातील उद्योजक, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि मान्यवर उपस्थित होते.
‘भारताच्या विकास क्षमतेवर जगाचा विश्वास वाढला’
फिनटेक क्षेत्रातील तरुणाईची ऊर्जा, नवकल्पना, जोखीम घेण्याची तयारी आणि मोठी स्वप्ने ही विकसित भारताच्या भविष्याबाबतचा विश्वास अधिक मजबूत करत असल्याचे मोदी म्हणाले. जागतिक पातळीवर संघर्ष आणि अनिश्चिततेचे वातावरण असतानाही भारताने ७.८ टक्के आर्थिक विकासदर नोंदवला आहे. त्यामुळे भारताच्या विकासक्षमतेवर जगाचा विश्वास आणखी दृढ झाला असून, देशातील व्यापक आर्थिक स्थैर्य आणि संरचनात्मक सुधारणांना जागतिक मान्यता मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘UPI हा भारताच्या फिनटेक यशाचा आधारस्तंभ’
भारताच्या फिनटेक यशोगाथेत UPI हा सर्वात मोठा आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. २५ ऑगस्ट रोजी UPI ने दहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. दहा वर्षांपूर्वी सर्वसामान्यांच्या हातात बँकिंग सेवा सहज उपलब्ध होतील, ही कल्पना अनेकांना अशक्य वाटत होती. मात्र आज बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेले कोट्यवधी नागरिक फिनटेकच्या विकासाचे भागीदार बनले आहेत.
ऑगस्ट महिन्यात UPIच्या माध्यमातून २,४०० कोटींहून अधिक व्यवहार झाल्याचे मोदी यांनी सांगितले. UPI आता भारतापुरते मर्यादित राहिले नसून ११ देशांमध्ये उपलब्ध झाले आहे. भारताने इतर देशांच्या पेमेंट प्रणालींसोबतही जोडणी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘भारतीय फिनटेक क्षेत्र जगासाठी नवे मानक ठरवू शकते’
परदेशात काम करणाऱ्या भारतीयांकडून भारतात पाठविल्या जाणाऱ्या पैशांवरील व्यवहार खर्च कमी करण्यासाठी UPI महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही मोदी म्हणाले. भारताने इतरांनी तयार केलेल्या नियम आणि मानकांचा वापर करण्यापलीकडे जात स्वतःची डिजिटल पेमेंट मानके विकसित करून ती जगाशी जोडण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
AI, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे नवी संधी
फिनटेकच्या पुढील टप्प्यात एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे वित्तीय क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष परिणामांमध्ये वापर करण्यासाठी फिनटेक उद्योगाने ठोस उद्दिष्टे निश्चित करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
यामध्ये जागतिक दर्जाची सायबर सुरक्षा, नैतिक डेटा संरक्षण मानके, मजबूत फिनटेक नियामक व्यवस्था आणि उद्योग-नवोन्मेष परिसंस्था उभारण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येक फिनटेक कंपनीच्या पारदर्शक मूल्यांकनासाठी ‘फिनटेक कन्झ्युमर प्रोटेक्शन इंडेक्स’ विकसित करण्याची गरजही मोदी यांनी अधोरेखित केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App