विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) अपेक्षित राजकीय महत्त्व आणि सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची उघड खंत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी महायुतीतील पक्षाच्या स्थानाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. काँग्रेससोबत आघाडीत असताना रिपब्लिकन पक्षाला जागावाटपात योग्य प्रमाणात संधी मिळत होत्या; मात्र भाजपसोबत महायुतीमध्ये आल्यानंतर आमच्या पक्षाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. Ramdas Athawale
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निर्णय प्रक्रिया आणि जागावाटपात अपेक्षित स्थान नसल्याची भावना
पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, सध्या रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक असला, तरी प्रत्यक्ष राजकीय निर्णय प्रक्रिया आणि जागावाटपामध्ये पक्षाला अपेक्षित स्थान दिले जात नाही. काँग्रेससोबत असताना पक्षाला जागावाटपात सन्मानजनक संधी मिळत होती. परंतु सध्याच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताकाळात रिपब्लिकन पक्षाच्या मागण्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली. महायुतीमध्ये आमच्या पक्षाला केवळ सहभागी करून न घेता सत्तेतील योग्य वाटाही मिळायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आगामी विधान परिषदेच्या जागांवरून ठाम मागणी
आगामी राजकीय नियुक्त्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतिनिधित्वाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षासाठी काही जागा देण्याची मागणी पुढे केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राजकारणात पुढे जाण्यासाठी संधी मिळावी, यासाठी विधान परिषदेच्या काही जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. आठवले यांनी यापूर्वीही अनेकदा महायुतीमधील प्रतिनिधित्वाबाबत आपली भूमिका मांडली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेस काळातील जागावाटपाचा दाखला देत महायुतीवर नाराजी व्यक्त केल्यामुळे घटक पक्षांच्या सत्तेतील वाट्याचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. यावर महायुतीचे नेते नेमकी काय भूमिका घेतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या मागणीला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App