विशेष प्रतिनिधी
अमरावती: राज्यात आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असताना, आता मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या जाचामुळे एका 45 वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सावंगा गुरव येथे संदीप अवधूत करडे (वय 45, रा. शिलोड) या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे सावंगा गुरवसह शिलोड परिसरात मोठी खळहळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या आणि मानसिक त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिला आहे.
₹1,50,000 कर्जाचे 3 हप्ते थकल्याने वसुलीचा ससेमिरा
मृत शेतकरी संदीप करडे यांच्या आत्महत्येमागे आर्थिक विवंचना आणि वसुलीचा मानसिक तणाव कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संदीप करडे यांची शिलोड येथे अंदाजे 1 हेक्टर शेती होती. शेतीच्या आणि कौटुंबिक गरजांसाठी त्यांनी एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून सुमारे ₹1,50,000 (दीड लाख रुपये) कर्ज घेतले होते. नापिकी आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना या कर्जाचे सलग 3 हप्ते भरता आले नव्हते. हप्ते थकल्यामुळे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्यांच्या मागे वसुलीचा सततचा तगादा लावण्यात आला होता. या वाढत्या दबावामुळे आणि नैराश्येतून त्यांनी सावंगा गुरव येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून अधिकृत तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दोन अल्पवयीन मुले आणि वृद्ध आई उघड्यावर घरातील कर्त्या पुरुषाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण करडे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. संदीप करडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी उज्वला, 17 वर्षांची मुलगी, 12 वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या संदीप यांच्या निधनामुळे दोन अल्पवयीन मुलांचे शिक्षण, त्यांचे भविष्य आणि वृद्ध आईच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न उज्वला करडे यांच्यासमोर उभा राहिला आहे. गावकऱ्यांकडून या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
धमकावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करू: बावनकुळे
या घटनेची माहिती मिळताच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत मायक्रो फायनान्स कंपन्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. बावनकुळे म्हणाले की, हे जे लोक शेतकऱ्यांच्या मागे लागलेले आहेत, जे मायक्रो फायनान्सचे लोक शेतकऱ्यांना धमकीचे फोन करत आहेत किंवा त्यांना मानसिकरीत्या प्रेशराईझ करत आहेत, त्याची माहिती सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घेतली पाहिजे. अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल, तर शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत, सरपंच, स्थानिक आमदार किंवा प्रशासनातील कोणालाही तात्काळ हे कळवले पाहिजे. शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या अशा फायनान्स कंपन्यांवर आम्ही निश्चितपणे कडक कारवाई करू, असे आश्वासन देत बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App