विशेष प्रतिनिधी
मुंबई: “राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या संकटात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पोलादासारखे खंबीर उभे आहे. बळीराजाची दिवाळी कोणत्याही परिस्थितीत काळी होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे; म्हणूनच मंत्रिमंडळाने यंदाची संपूर्ण दिवाळी शेतकऱ्यांना समर्पित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची तातडीची अग्रीम मदत थेट वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांची जबरदस्ती मोडून काढण्यासाठी शिवसेना प्रत्येक तालुक्यात ‘शेतकरी मदत कक्ष’ स्थापन करत आहे,” अशी जाहीर घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. Eknath Shinde
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारण उपाययोजना, ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी भरती आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या ‘रेजिम चेंज’च्या अपप्रचाराचा अक्षरशः समाचार घेतला.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
कॅबिनेट बैठकीत बळीराजासाठी घेतलेल्या दिलासादायक निर्णयांचा पाढा वाचताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवले आहे की, सर्व मंत्री यंदाची दिवाळी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरी करतील. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हेच आमचे आद्यकर्तव्य आहे.”
5,000 रुपयांची तातडीची मदत
“शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळावा म्हणून प्रत्येकी 5,000 रुपयांची प्राथमिक अग्रीम मदत मंजूर केली असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा होत आहे. यानंतर शेतांचे पंचनामे पूर्ण झाल्यावर उर्वरित संपूर्ण नुकसानभरपाई व सर्व शासकीय सवलती वेळेत दिल्या जातील.”
पंतप्रधान मोदी पाठीशी खंबीर
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याने कोणीही धीर सोडू नये किंवा टोकाचे पाऊल उचलू नये, हे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांचे रक्षण करेल.”
सावकार आणि मायक्रो फायनान्सची दादागिरी रोखणार
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. “खासगी सावकार, बँका अथवा मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन दमदाटी करून जबरदस्तीने कर्जवसुली केली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
तालुका पातळीवर मदत कक्ष
“शिवसेनेमार्फत प्रत्येक तालुक्यात ‘शेतकरी मदत कक्ष’ कार्यान्वित करण्यात येत आहेत. शासकीय अनुदानाचे फॉर्म भरणे, ई-केवायसी (KYC) पूर्ण करणे, पंचनाम्यांतील त्रुटी दूर करणे आणि शेतकऱ्यांना कायदेशीर मदत देण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन करतील.”
ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी भेट
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे जाळे अधिक भक्कम करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. “ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील गरीब रुग्णांना उपचारांसाठी शहरात चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर विशेषज्ञ (Specialist) डॉक्टरांची भरती करून त्यांना थेट सेवेत दाखल करण्यात आले आहे.”
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय पथकाचे जाहीर कौतुक केले.
रेजिम चेंजवाल्यांना रिजेक्शनची हॅट्रिक
विरोधकांच्या आंदोलनावर आणि संविधानाच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकीय नॅरेटिव्हवर एकनाथ शिंदे यांनी घणाघाती टीका केली. “एका हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घेऊन फिरायचे आणि दुसऱ्या हाताने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व निवडणूक आयोगावर मोर्चे काढायचे, हे विरोधकांचे दुटप्पी ढोंग आहे. केरळमधील काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा मागणे हा संविधानाचा उघड अपमान आहे.”
परकीय शक्तींचा हस्तक्षेप आणि अपप्रचार
“देशाची तुलना बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंकेशी करून अराजकता माजवण्याचा विरोधकांचा कट आहे. पण हा 140 कोटी देशभक्तांचा भारत आहे! सत्तेत कोणाला बसवायचे आणि कोणाला घरी पाठवायचे, हा निर्णय येथील सुजाण जनताच घेते.”
‘नोट चोरी’ करणारे आता ‘वोट चोरी’ ओरडतात
“देशातील जनतेने निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना सलग 3 वेळा नाकारून घरी बसवले आहे. ही ‘रेजिम चेंज’ नसून जनतेने दिलेली ‘रिजेक्शनची हॅट्रिक’ आहे! वर्षानुवर्षे नोटांची चोरी करणाऱ्यांना आता वोट चोरीची स्वप्ने पडत आहेत. तुमचे 100 खासदार निवडून आले, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये तुम्ही जिंकलात, तिथे जनतेने मतदान केले होते की वोट चोरी झाली होती? पराभवाच्या नैराश्यातून देशात अराजकता पसरवणाऱ्यांना जनता निवडणुकीत पुन्हा धडा शिकवेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App