विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे हे आता मराठा समाजाचे संघर्षयोद्धा राहिलेले नसून ते भ्रष्ट कंत्राटदारांची टोळी चालवणारे ‘टेंडर योद्धा’ बनले आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी छुपे संगनमत करून जरांगेंच्या टोळीने तब्बल 5,426 कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज केले असून त्यापैकी 3,770 कोटी रुपयांची कामे थेट पळवली आहेत. एका बाजूला मराठ्यांच्या मुलांचे रक्त सांडवायचे आणि दुसऱ्या बाजूला समाजाची विक्री करून तिजोरी भरायची, असा हा पापाचा उद्योग सुरू आहे,” असा हल्लाबाेल मनाेज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बाेलताना बारस्कर म्हणाले, जरांगे यांच्या घरातील लोक वाळूचोरीत गुंतलेले आहेत. मनोज जरांगे यांच्या पत्नीचा भाऊ विलास खेडकर हा उघडपणे वाळूचोरी करतो. त्यांचा ‘अदृश्य हात’ असलेला संजय कटारे हादेखील वाळूचोर असून, त्याने मार्च 2023 मध्ये 4 कोटी रुपयांहून अधिक रकमेची वाळू चोरली होती. ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या आणि अवघा आयटीआय पास असलेल्या या कंत्राटदाराला 14 कोटी रुपयांची शासकीय कामे कशी मिळतात? छत्रपती संभाजीनगरातील प्रोझोन मॉलसमोरील क्रीम एरियात कोट्यवधींचा प्लॉट खरेदी करण्यासाठी यांच्याकडे पैसा कुठून आला?”
बारस्कर म्हणाले, कंत्राटदार किशोर बलांडे हा थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीतून आंदोलनाच्या ठिकाणी आला होता. त्यानंतर आंदोलनाच्या मंचावर त्याला स्थान मिळाले. विखे-पाटलांनी या सिंडिकेट टोळीला टेंडरसाठी 5,426 कोटी रुपयांची कामे उपलब्ध करून दिली. त्यातील 3,770 कोटी रुपयांच्या निविदा बलांडे, पाटील, धुमाळ अशा पाच-सहा कंत्राटदारांनी संगनमताने पळवल्या आहेत.” गरज नसलेल्या कामांची बनावट सूची तयार करण्यात आली. अंदाजपत्रके अवाजवी फुगवून निविदा मॅनेज केल्या गेल्या. शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाचे आणि मदतीचे 82 कोटी रुपये काढून बलांडे आणि मेंगरे या कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आले आहेत.
जरांगे नेहमी भाषणात सांगतात की मराठ्यांवर जमिनी विकण्याची वेळ आली आहे; मग त्यांच्या सख्ख्या पुतण्याने (स्वस्तिक) करोडो रुपयांची जमीन कशी खरेदी केली? आप्पासाहेब कुढेकर याच्या नावाने तब्बल 98 एकर जमीन कशी घेतली गेली? या अफाट संपत्तीचा स्रोत काय? असा सवाल बारस्कर यांनी केला.
मी कधीही बंद खोलीत चर्चा करत नाही, असा आव आणणाऱ्या जरांगेंनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत बंद दाराआड काय खलबते केली? तसेच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे एकत्र असताना माध्यमांच्या प्रतिनिधींना खोलीबाहेर का काढण्यात आले? तिथे नेमकी कोणती सौदेबाजी झाली?” असा थेट सवाल त्यांनी केला.
कमी दरात आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या इतर अनुभवी कंपन्यांच्या निविदा हेतुपुरस्सर नाकारण्यात आल्या. केवळ तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘माणिक इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला विखे-पाटलांच्या आशीर्वादाने तब्बल 635 कोटी रुपयांचे काम देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत अधिकारी आणि प्रशासन हतबल झाले असून, हे एका मोठ्या टोळीचे संघटित गुन्हेगारी कृत्य आहे, असा आराेप बारस्कर यांनी केला.
बारस्कर म्हणाले, “कोणी कायदेशीर मार्गाने पैसे कमवले तर आमचा विरोध नाही. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली निष्पाप समाजाच्या भावनांशी खेळून आणि समाजाला विकून उभे केलेले हे पापाचे साम्राज्य मी उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. मनोज जरांगे हा समाजसेवक नसून आधुनिक ‘रहमान डकैत’ आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळातील कामांमध्ये गैरव्यवहार करणारा हेमंत ऊर्फ हणमंत धुमाळ आणि त्याची टोळी पुण्यातल्या मोठ्या दुकानांच्या आणि सराफी पेढ्यांच्या मागे लपली आहे. जरांगे स्वतः सांगत होते की त्यांच्या पत्नी भीक मागायच्या, तीन महिने 500 रुपयांची नोट पाहिली नाही; पण आज त्यांच्या दिमतीला असलेल्या आलिशान गाड्या कंत्राटदार किशोर बलांडे यांच्या आहेत. जरांगे हे पूर्णपणे विखे-पाटलांचे आणि सरकारचे लाडके प्यादे आहेत.
या संपूर्ण महाघोटाळ्याची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे मी लवकरच थेट ईडीकडे (ED) सोपवणार आहे. हा महाघोटाळा उघड केल्यामुळे माझ्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे; मात्र तक्रार करूनही पोलीस मला पुरेशी सुरक्षा देत नाहीत,” असा आराेपही अजय बारस्कर यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App