विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांशी संबंधित कथित घोटाळे, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील दिरंगाईच्या मुद्द्यावरून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्या नकली भुवयांवरून टोला लगावत आंदोलनस्थळी येण्याचे आव्हान दिले. त्यावर चित्रा वाघ यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे पलटवार करत रेव्ह पार्टीचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिले.
रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा
MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सरकारमधील महिला नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. यावेळी चित्रा वाघ यांच्यावर टीका करत रोहिणी खडसे म्हणाल्या, “काळ्याकुट्ट नकली भुवया घेऊन… अगं बाई, तू ये,” अशा शब्दांत त्यांनी चित्रा वाघ यांना आंदोलनस्थळी येण्याचे आव्हान दिले.
विद्यार्थ्यांचे आंदोलन ‘नौटंकी’ असल्याचे म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांची व्यथा समजून घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक आपल्या मुलांना अधिकारी बनवण्यासाठी मोठे कष्ट घेतात. त्यामुळे त्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे खडसे यांनी सांगितले.
चित्रा वाघ यांचा पलटवार
रोहिणी खडसे यांच्या टीकेनंतर चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले. “राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडल्या तर आरसा दाखवावाच लागतो,” असे म्हणत त्यांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला.
दुसऱ्या महिलेवर खालच्या पातळीवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या घरातील प्रकरणांवर उत्तर द्या, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. “स्वतःचं घर काचेचं असताना आमच्यावर दगड फेकायची चूक करू नका,” असेही त्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांसमोर राजकीय टीका करताना वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ आणणे योग्य नाही, असे सांगत केवळ आंदोलनकर्त्यांकडून टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर वैयक्तिक टीका करू नये, असा सल्लाही चित्रा वाघ यांनी दिला.
‘छेडलं तर सोडत नाही’चा इशारा
आपल्या पोस्टच्या शेवटी चित्रा वाघ यांनी “हम किसी को छेडते नही, और अगर किसीने छेडा, तो छोडते नही,” असा इशाराही दिला. त्यामुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, MPSCच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थी आंदोलन करत असून, परीक्षेची प्रक्रिया, कथित पेपरफुटी आणि आयोगाच्या कारभाराशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडून ठोस भूमिका घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App