विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या मागण्यांसाठी ठाम राहावे, असे आवाहन करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
आंदोलनस्थळी असलेल्या मोठ्या पोलीस बंदोबस्ताचा उल्लेख करत शिंदे म्हणाल्या, “दोन-तीन दिवसांत पोलीस येतील, लाठीचार्जही होऊ शकतो; मात्र तुम्ही मागे हटू नका. ही लढाई लढत राहा.” आंदोलनाला परवानगी असतानाही विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांचा हा संघर्ष केवळ त्यांच्या मागण्यांपुरता मर्यादित नसून लोकशाही आणि संविधानिक हक्कांशीही जोडलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी तैनात असलेल्या पोलिसांकडे पाहून शिंदे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.“इतके पोलीस पाहून ते आंदोलनात सहभागी व्हायला आले आहेत की आम्हाला अटक करायला, हेच समजत नाही,” असे त्या म्हणाल्या.सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहावे, असे सांगत लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष करता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनांचाही शिंदे यांनी उल्लेख केला.गांधीवादी विचार, संविधान आणि सर्वधर्मसमभाव ही भारतीय लोकशाहीची मूलभूत मूल्ये असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचा आणि मदतीचा मुद्दाही शिंदे यांनी उपस्थित केला.
अनेक शेतकऱ्यांना मागील नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. “तिकडे शेतकऱ्यांचा अंत पाहिला जात आहे आणि इथे विद्यार्थ्यांचा,” अशी टीका त्यांनी केली.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिंदे यांनी आपला वैयक्तिक अनुभवही सांगितला. “मीदेखील MPSCची तयारी केली होती. मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर मी कायद्याचे शिक्षण घेतले,” असे त्या म्हणाल्या.
स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक आणि विश्वासार्ह तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मतदारयादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेचा (SIR) उल्लेख करत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप केला.
प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्ह्यांची भीती विद्यार्थ्यांनी बाळगू नये, असेही शिंदे म्हणाल्या. “FIR करू द्या. ती मागे घेण्याची ताकदही आपल्यात आहे,” असे सांगत त्यांनी आंदोलकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.सरकारी अधिकारी अनेकदा राजकीय निर्णयांच्या चौकटीत काम करत असल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असल्याचे म्हटले.
‘या लढाईत युवाशक्तीचा मोठा वाटा’
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट करत शिंदे यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली. “युवाशक्तीने आपली ताकद दाखवून दिली तर लोकशाहीची ताकद काय असते, हे सरकारला कळेल. या लढाईत तुमचा मोठा वाटा असेल,” असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App