विशेष प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना आज नांदेड जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून दुष्काळ पाहणी दौरे होत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्या लोहा तालुक्यातील दुष्काळसदृश भागाची पाहणी करणार आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेही आज नांदेडसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. Sunetra Pawar
सुनेत्रा पवार सकाळी नांदेड विमानतळावर दाखल होणार असून, त्यानंतर लोहा तालुक्यातील शेतकरी आणि पिकांची पाहणी करणार आहेत. दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा २६ आणि २७ सप्टेंबर असा दोन दिवसीय दुष्काळ पाहणी दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात ते सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे नियोजन आहे.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
आजच्या दौऱ्यात सकाळी साडेदहा वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे आदित्य ठाकरे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील खानापूर आणि आष्टा मोड, लातूर जिल्ह्यातील तावरशी ताळ, नांदेड जिल्ह्यातील गऊळ आणि हिंगोली जिल्ह्यातील माळवाटा शिवार येथे ते भेट देणार आहेत.
राज्यातील पावसाच्या स्थितीमुळे अनेक भागांत शेतीपिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नांदेड जिल्हा प्रशासनानेही दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक पाहणी, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि शेतकऱ्यांना मदत यासंबंधीच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली आहे. आता सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे नांदेडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
पावसाअभावी पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि आर्थिक मदतीचा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे या पाहणी दौऱ्यांनंतर सरकारकडून कोणत्या उपाययोजना जाहीर होतात आणि विरोधकांकडून कोणत्या मागण्या पुढे केल्या जातात, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि पीकविम्याची मदत तातडीने देण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांकडून केली जात आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App