पवार कुटुंबातील संघर्ष कारखान्याच्या निवडणुकीतही? युगेंद्र पवारांचा शेतकरी पॅनेल मैदानात

विशेष प्रतिनिधी

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पॅनेलकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी (ता. १६) बारामतीतील एका हॉटेलमध्ये घेण्यात येणार आहेत. या मुलाखतींसाठी सुमारे १३० इच्छुकांची नावे असल्याची माहिती असून, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी या संख्येत काही बदल होण्याची शक्यता आहे.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. अंतिम मुदतीपर्यंत तब्बल ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, एकूण १ हजार ३३ अर्जांची विक्री झाली होती. त्यामुळे आता अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची नेमकी संख्या किती राहते आणि त्यानंतर माघारीच्या टप्प्यात किती उमेदवार रिंगणात राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युगेंद्र पवारांच्या पॅनेलमुळे अजित पवार गटासमोर आव्हान

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र शेतकरी पॅनेल मैदानात उतरणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बारामतीच्या राजकारणात पवार कुटुंबातील दोन गटांमधील राजकीय संघर्षाचा परिणाम आता सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरही दिसून येण्याची शक्यता आहे.

युगेंद्र पवार यांच्या पॅनेलकडून उमेदवार निवडीसाठी मुलाखती घेऊन सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. मतदारसंघनिहाय समीकरणे, उमेदवारांची स्थानिक पकड आणि शेतकऱ्यांमधील संपर्क या बाबींचा विचार करून अंतिम पॅनेल निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.



सुनेत्रा पवार गटाकडूनही हालचालींना वेग

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडूनही सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ आणि अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

मात्र, विद्यमान सत्ताधारी गटाकडून निवडणूक प्रक्रियेबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. उमेदवारांची नावे, पॅनेलची रचना आणि निवडणूक रणनीती याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या गटाकडून नेमकी कोणती रणनीती आखली जात आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

शिवसेना आणि भाजपकडूनही स्वतंत्र तयारी

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे तयारी करत असल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे चंद्रराव तावरे यांच्या गटाकडूनही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सुरुवातीला अनेक पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार

उमेदवारी अर्जांची छाननी आणि त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. मात्र, प्रमुख गटांकडून पॅनेलची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष लढतीचे स्वरूप समोर येईल.

युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेल, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट, शिवसेनेचे संभाव्य स्वतंत्र पॅनेल आणि चंद्रराव तावरे यांच्या गटाची तयारी पाहता यंदाची सोमेश्वर कारखाना निवडणूक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत. विशेषतः पवार कुटुंबातील दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

Yugendra Pawar’s ‘Shetkari Panel’ enters the fray.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात