विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, वर्षअखेरीस मुदत संपणाऱ्या या मतदारसंघांसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून सत्ताधारी महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असल्याने उमेदवारीचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील पक्षांची मोर्चेबांधणी
अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानपरिषद निवडणुकांतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या राजकीय वाटा निवडल्या. त्यात अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुणे पदवीधर मतदारसंघातील समीकरणांनाही नवे वळण मिळाले आहे.
राष्ट्रवादीच्या प्रताप माने यांचा अरुण लाड यांच्यावर निशाणा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक असलेले प्रताप माने यांनी सांगली येथे झालेल्या आढावा बैठकीत विद्यमान आमदार अरुण लाड आणि त्यांचे पुत्र शरद लाड यांच्यावर टीका केली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
पदवीधर मतदारांच्या प्रश्नांवर अरुण लाड यांनी विधान परिषदेत अपेक्षित भूमिका बजावली नसल्याचा आरोप माने यांनी केला. पदवीधर मतदारांना त्यांची कामगिरी माहिती असून, आगामी निवडणुकीत मतदार त्यांना योग्य उत्तर देतील, असा दावा त्यांनी केला.
माने यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपली तयारी किती गांभीर्याने सुरू केली आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
हसन मुश्रीफांचा ‘अश्वमेध’चा दावा
सांगलीतील आढावा बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ठामपणे मांडला. या जागेसाठी राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली असून, मतदारसंघ जिंकण्यासाठी ‘अश्वमेध’ सोडल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना मुश्रीफ यांनी अरुण लाड यांनाही आवाहन केले. आपल्या मुलाच्या उमेदवारीचा आग्रह न धरता प्रताप माने यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना पाठिंबा द्यावा, असे खुले आवाहन त्यांनी केले.
भाजपसमोरही उमेदवारीचा पेच
राष्ट्रवादीकडून जागेवर दावा केला जात असतानाच भाजपनेही या मतदारसंघासाठी तयारी सुरू केली आहे. शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाच्या संभाव्य रणनीतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी स्थानिक पातळीवरील दावेदारीमुळे या जागेचा तिढा वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादीने आक्रमकपणे दावा केल्याने भाजपची भूमिका काय राहणार, तसेच अखेर पुणे पदवीधर मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्षांकडून सुरू झालेल्या या हालचाली पाहता, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक केवळ विरोधकांविरुद्धची लढत न राहता महायुतीतील अंतर्गत ताकदीचीही कसोटी ठरण्याची शक्यता आहे. उमेदवार कोण आणि जागा नेमकी कोणाच्या वाट्याला, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App