विशेष प्रतिनिधी
टेक जगताचे लक्ष लागलेल्या ॲपलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये यंदा मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. वाढत्या मेमरी चिपच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या आयफोन लॉन्चच्या पद्धतीत बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. यंदा स्टँडर्ड ‘iPhone 18’ ऐवजी केवळ प्रीमियम मॉडेल्स सादर केले जाण्याची शक्यता असून, त्यामध्ये iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि बहुप्रतीक्षित फोल्डेबल आयफोनचा समावेश असू शकतो.
विशेष म्हणजे, १ सप्टेंबर रोजी टिम कूक यांच्यानंतर कंपनीची सूत्रे स्वीकारलेले नवे CEO जॉन टर्नस यांचे हे पहिले मोठे सादरीकरण असणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
फोल्डेबल आयफोनचे डिझाइन कसे असेल?
ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, फोन उघडल्यानंतर त्याचा डिस्प्ले सुमारे ७.६ ते ७.८ इंचांचा असू शकतो. त्यामुळे तो आकाराने आयपॅड मिनीसारखा दिसण्याची शक्यता आहे. बाहेरील बाजूस सुमारे ५.५ इंचांची कव्हर स्क्रीन दिली जाऊ शकते.
फोन पूर्णपणे उघडल्यानंतर त्याची जाडी अवघी ४.५ मिमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फोल्डेबल डिझाइनमध्ये स्क्रीनवरील घडी कमी दिसावी, यासाठी ॲपलने मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्याचे सांगितले जाते.
Face ID ऐवजी Touch ID?
फोल्डेबल डिझाइनमुळे फेस आयडीच्या जागी Touch ID देण्याची शक्यता आहे. फोनमध्ये अत्याधुनिक A20 चिपसेट आणि ५,०००mAh किंवा त्याहून मोठी बॅटरी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता असून, टेलिफोटो लेन्स नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही स्क्रीनवर पंच-होल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
किंमत ऐकून धक्का बसणार?
फोल्डेबल आयफोनची किंमत प्रीमियम श्रेणीत असण्याची शक्यता आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत सुमारे २.२० लाख रुपये असू शकते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत ३ लाख रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्क्रीनवरील क्रिझ कमी करणे, टिकाऊ हिंज तयार करणे आणि लवचिक कव्हर ग्लास बसवणे ही या फोनसमोरील प्रमुख तांत्रिक आव्हाने आहेत. यासाठी ॲपलने सुमारे दशकभर काम केल्याचा दावा केला जात आहे. टायटॅनियम-ॲल्युमिनियम हिंज आणि कॉर्निंगच्या सहकार्याने तयार केलेल्या लवचिक कव्हर ग्लासचा वापर होण्याची शक्यता आहे.
iPhone 18 Pro आणि Pro Max मध्येही मोठे बदल
फोल्डेबल आयफोनसोबत iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxमध्येही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. प्रो मॉडेल्समधील Dynamic Island पूर्वीपेक्षा लहान करण्याची शक्यता आहे.
कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी २-नॅनोमीटर चिपसेट आणि कंपनीचा नवा इन-हाउस C2 मॉडेम मिळू शकतो. याशिवाय मुख्य कॅमेऱ्यात DSLR कॅमेऱ्याप्रमाणे व्हेरिएबल अपर्चर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी प्रकाशातील फोटोग्राफी आणि डेप्थ कंट्रोल अधिक चांगले होऊ शकते.
रंगांच्या पर्यायांमध्येही बदल होण्याची शक्यता असून, सिल्व्हर आणि मॅट ब्लॅकसोबत लाईट ब्लू आणि चेरी या नव्या रंगांचा समावेश होऊ शकतो.
एकूणच, यंदाच्या ॲपल इव्हेंटमध्ये फोल्डेबल आयफोनची अधिकृत एंट्री होते का आणि iPhone 18 सीरिजमध्ये नेमके कोणते बदल पाहायला मिळतात, याकडे टेक विश्वाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App