विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीला आणखी मोठी झेप घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी स्वतंत्र आराखडाही तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. Marathi cinem
62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आधुनिक सुविधांनी सज्ज चित्रनगरी
चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक सुविधा आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी आधुनिक चित्रनगरी विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठी चित्रपटांचे आशयवैविध्य, प्रयोगशीलता आणि कलात्मक गुणवत्ता ही त्यांची मोठी ताकद आहे. देशातील दर्जेदार चित्रपटांमध्ये मराठी सिनेमाचे स्थान कायम राहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटांची कलात्मक ओळख जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटगृहांची उपलब्धता वाढवणार
मराठी चित्रपट उत्तम असले तरी ते मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटगृहांची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
मराठी रंगभूमीला देशातील सर्वोत्तम रंगभूमींपैकी एक मानले जाते. मराठी कलाकारांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही जपली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीही सातत्याने नवनवीन प्रयोग करत पुढे जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दिग्गज कलाकारांचा पुरस्काराने गौरव
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, तर सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात आले. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन खान यांनी त्यांचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.
मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिक सुविधा, अधिक स्क्रीन आणि नव्या तंत्रज्ञानाची साथ देऊन तिच्या विस्ताराला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे या घोषणेतून स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App