विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला व्यासपीठावर मराठीत बोलण्याची विनंती केली असता, “मी येरवडा जेलमध्ये सहा वर्षे राहिलो, तेव्हाही मराठी शिकू शकलो नाही,” अशी मिश्कील टिप्पणी संजय दत्तने केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. Sanjay Dutt
ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त आणि प्रताप सरनाईक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सरनाईक यांनी सध्या आपण सर्वांना मराठी शिकवत असल्याचे सांगत संजय दत्तलाही मराठीत काही शब्द बोलण्याची विनंती केली.
त्यावर संजय दत्तने सुरुवातीला “तुम्हा सर्वांना नमस्कार” असे मराठीत म्हटले. त्यानंतर येरवडा कारागृहातील आपल्या वास्तव्यासंदर्भात विनोदी टिप्पणी केली. संजय दत्तच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी हशा पिकला. मात्र, कार्यक्रमातील हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचा नियम
दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाने राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी मराठीचे कार्यात्मक ज्ञान आवश्यक करण्याची भूमिका घेतली आहे.
ऑगस्टमध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारापुरते मराठीत संवाद साधता येणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रवाशाचे गंतव्यस्थान, भाडे, मार्ग, वेळ आणि इतर सामान्य गरजांबाबत साधा संवाद साधण्याची क्षमता अपेक्षित आहे.
या नियमाच्या अंमलबजावणीसाठी परिवहन विभागाने राज्यभरात चालकांची मराठी संवादक्षमता तपासण्याची मोहीमही राबवली होती. पहिल्याच दिवशी ८,२१७ रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी करण्यात आली होती, तर १,२६८ चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
त्यानंतर चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ देण्यात आला. सरकारकडून कोणाचाही रोजगार हिरावून घेण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, चालकांना केवळ जुजबी आणि व्यवहारापुरते मराठी बोलता आले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
‘हा कोणता न्याय?’; नरेंद्र मेहतांचा सरनाईकांवर निशाणा
संजय दत्तच्या वक्तव्यावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरच निशाणा साधला आहे. संजय दत्त व्यासपीठावर मराठी येत नसल्याचे सांगतो आणि त्यावर मंत्री हसतात; मात्र सामान्य रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी येत नसेल तर त्याच्यावर कारवाईची भाषा केली जाते, हा कोणता न्याय? असा सवाल मेहता यांनी उपस्थित केला.
सरनाईक यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याची टीकाही त्यांनी केली.
संजय राऊतांकडूनही टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली आहे.
मराठीच्या मुद्द्यावर रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात कठोर भूमिका घेतली जाते. मग महाराष्ट्रातील व्यासपीठावर संजय दत्तने मराठी येत नसल्याचे सांगितल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी मराठी शिकण्याबाबत सांगायला हवे होते, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.
या संपूर्ण प्रकाराला त्यांनी “ढोंगीपणा” असल्याचे म्हणत सरनाईक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे संजय दत्तच्या एका मिश्कील वक्तव्यामुळे राज्यातील मराठी भाषेच्या नियमांवरून सुरू असलेली राजकीय चर्चा आणखी तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App