विशेष प्रतिनिधी
मुंबई : पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. जमिनीत पाणी जिरवणे, वाहून जाणारे पाणी अडवणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.
राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून, १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नवा संकल्प करण्याची संधी आहे.
जमिनीचा उतार आणि पावसाचा विचार महत्त्वाचा
मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
कमी पाऊस, कमी उतार आणि कमी खोलीची जमीन असलेल्या भागात जागच्या जागी पाणी मुरविणाऱ्या पद्धती उपयुक्त ठरतात. तर जास्त पाऊस आणि अधिक उताराच्या भागात मूलस्थानी जलसंधारणासोबत अभियांत्रिकी उपाययोजनांची जोड देणे आवश्यक आहे.
बांधांची दुरुस्ती आणि योग्य सांडवा
जमिनीच्या उतारानुसार शेताचे भाग पाडून योग्य ठिकाणी बांध घालावेत. फुटलेले बांध वेळेत दुरुस्त करावेत आणि अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी योग्य ठिकाणी सांडवा ठेवावा.
सांडव्यामधून माती वाहून जाऊ नये यासाठी दगडी बांधाचा वापर करता येतो. मातीचे बांध पावसामुळे पुन्हा फुटू नयेत यासाठी त्यावर स्टायलो, मद्रास अंजन, खस, सुबाभूळ आणि ग्लिरिसिडिया यांसारख्या वनस्पतींची लागवड करता येते.
सपाट वाफ्यांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत
ज्या ठिकाणी जमिनीत पाणी मुरण्याचा वेग जास्त आणि उतार कमी आहे, तेथे उताराला आडवे सपाट वाफे तयार करता येतात. साधारण ६ बाय ६ मीटर अंतरावर तयार केलेले वाफे पावसाचे पाणी जागच्या जागी मुरविण्यास मदत करतात. योग्य पद्धतीने केल्यास जमिनीत नेहमीपेक्षा अधिक ओलावा साठवला जाऊ शकतो.
सरी-वरंबे : पाणी अडविण्याचा प्रभावी उपाय
मध्यम ते भारी जमिनीत उताराला आडव्या सरी तयार केल्यास पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये साठून जमिनीत मुरते. या पद्धतीमुळे मातीची धूप कमी होते आणि जमिनीतील ओलावा वाढतो. योग्य नियोजन केल्यास उत्पादनातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होते.
बंदिस्त सरी-वरंबे ही पद्धत विशेषतः कोरडवाहू, चोपण आणि क्षारयुक्त जमिनीत उपयुक्त ठरते. अधिक पाऊस झाल्यास पाणी संथ गतीने बाहेर पडत असल्याने जमिनीतील पाणी मुरण्यास वेळ मिळतो.
तुटक आणि सलग समतल चर
पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमिनीवरून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी सलग समतल चर उपयुक्त ठरतात. समपातळी रेषेवर चर तयार केल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो.
तुटक समतल चर हीदेखील याच स्वरूपाची पद्धत असून, त्यामध्ये चर सलग न ठेवता तुटक स्वरूपात तयार केले जातात. चराच्या खालच्या बाजूस तयार होणाऱ्या बांधावर झाडे आणि गवताची लागवड करता येते.
शेततळे : पावसाचे पाणी साठवून पुन्हा वापरा
पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी शेतात योग्य ठिकाणी शेततळे तयार करता येते. शेतातून वाहणारे पाणी शेततळ्याकडे वळवण्यासाठी गवताने आच्छादित चारी तयार करावी.
शेततळ्याला योग्य अस्तरीकरण केल्यास पाणी अधिक काळ साठवून ठेवता येते. हे पाणी पिके आणि फळबागांना गरजेच्या काळात संरक्षित सिंचनासाठी वापरता येते. शेततळ्याचे आकारमान आणि जागा ठरवताना पाऊसमान, पाणलोट क्षेत्र, जमिनीचा प्रकार, उतार आणि पीक पद्धतीचा विचार करणे आवश्यक आहे.
सिमेंट नालाबांधामुळे भूजलपातळीत वाढ
सिमेंट नालाबांधामुळे नाल्यातील वाहत्या पाण्याचा वेग कमी होऊन पाण्याचा साठा निर्माण होतो. त्यामुळे परिसरातील विहिरी आणि इतर जलस्रोतांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
सिमेंट नालाबांध उभारताना नाल्याची रुंदी, पाणलोट क्षेत्र, नाल्याचा उतार, दोन्ही बाजूंचे स्थिर काठ आणि जमिनीची स्थिती यांचा तांत्रिकदृष्ट्या विचार करणे आवश्यक आहे. नालाबांधाची साठवणक्षमता कायम राखण्यासाठी गाळ साचू नये यासाठी पाणलोट क्षेत्रात गाळप्रतिबंधक कामे करणे आणि आवश्यकतेनुसार गाळ काढणे महत्त्वाचे आहे.
जलसंधारणातून जलसुरक्षित शेतीकडे
जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणे नव्हे, तर पावसाचे प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे, मातीची धूप रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे होय. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जलसंधारण पद्धतींची निवड केल्यास कमी पाण्यातही अधिक उत्पादन घेण्यास मदत होऊ शकते.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष शेतीत उतरवून महाराष्ट्राला अधिक जलसुरक्षित आणि शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी जलसंधारण अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App