विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तिबेटच्या निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान लोबसांग सांगेय यांनी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबत गंभीर दावा केला आहे. जिनपिंग यांना आतापर्यंत दोन वेळा हार्ट अटॅक आल्याची माहिती चीनच्या प्रशासनातील एका वरिष्ठ माजी अधिकाऱ्याने आपल्याला दिल्याचे सांगेय यांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
ऑगस्टच्या अखेरीस शी जिनपिंग किर्गिस्तानमध्ये पोहोचले होते. विमानातून उतरताना त्यांचा एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये ते पत्नी पेंग लियुआन यांचा हात घट्ट पकडून सावधपणे पायऱ्या उतरताना दिसत होते. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले.
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी जिनपिंग यांचा चेहरा सुजलेला आणि चालताना अस्थिरता जाणवत असल्याचा दावा केला. तिबेट, तैवान तसेच परदेशातील चिनी समुदायांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा रंगली.
‘जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक’
न्यूज एजन्सी एएनआयशी झालेल्या संवादादरम्यान लोबसांग सांगेय यांनी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत हा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, चीनमधील प्रशासनातील एका वरिष्ठ माजी अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेत या अधिकाऱ्याने जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक आल्याचे सांगितले.
सांगेय यांनी जिनपिंग यांच्या अलीकडील सार्वजनिक उपस्थितीचा संदर्भ देत त्यांच्या चेहऱ्यावर सूज आणि चालण्याच्या पद्धतीकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते, चीनचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या मानसिक दबावाखाली काम करत आहेत आणि या दबावाचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
सांगेय यांनी पुढे जिनपिंग यांच्या निर्णयक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले. मानसिक तणाव आणि कथित ‘मेंटल फॉग’मुळे ते धक्कादायक निर्णय घेत असल्याचा दावा त्यांनी केला. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांवरील कारवाई, काही जनरल्सचे गायब होणे आणि माजी संरक्षणमंत्र्यांशी संबंधित घडामोडींचाही त्यांनी उल्लेख केला.
‘जिनपिंग यांच्या सुरक्षा यंत्रणेकडे प्रचंड ताकद’
चीनच्या सत्ताकेंद्रातील परिस्थितीवर भाष्य करताना सांगेय यांनी जिनपिंग यांच्या सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी नेतृत्वाच्या प्रभावाबाबतही दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिनपिंग यांचे सुरक्षा प्रमुख आणि लष्करी प्रमुख हे चीनमधील अनेक मंत्र्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली आहेत.
“जिनपिंग एका वेगळ्याच वास्तवात जगत आहेत,” असा दावा सांगेय यांनी केला.
उत्तराधिकारी जाहीर करण्याबाबतही मोठा दावा
जिनपिंग यांच्या उत्तराधिकारीबाबत विचारण्यात आले असता सांगेय यांनी चीनमध्ये सध्या स्पष्ट उत्तराधिकारी नसल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, जिनपिंग यांनी उत्तराधिकारी जाहीर केल्यास सत्तासंघर्ष निर्माण होऊन चीनमध्ये तख्तापलट होण्याची शक्यता आहे.
चीनच्या इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी याला ‘Emperor’s Dilemma’ असे संबोधले. त्यांच्या मते, एखाद्या सत्ताधीशाने उत्तराधिकारी निश्चित केला तर तोच उत्तराधिकारी भविष्यात सत्तेसाठी विद्यमान सत्ताधीशाला आव्हान देऊ शकतो. मात्र उत्तराधिकारी नियुक्त केला नाही तर सत्तेच्या वारसाहक्कावरून विविध गटांमध्ये संघर्ष निर्माण होण्याचा धोका असतो.
सांगेय यांच्या मते, याच भीतीमुळे जिनपिंग आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करत नसावेत. उत्तराधिकारी जाहीर केल्यास सत्तासंघर्ष आणि तख्तापलटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबत करण्यात आलेले हे दावे अद्याप स्वतंत्र किंवा अधिकृत स्रोतांकडून पुष्टी झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतचे दावे सध्या केवळ आरोप आणि अंदाजांच्या स्वरूपातच पाहिले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App