विशेष प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ हा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काही गणेश मंडळांकडून विरोध झाल्याचेही समोर आले आहे.
बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला. मात्र, आपली भूमिका मांडताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच सण-उत्सवांचे महत्त्व आणि सर्व घटकांच्या भावनांचा विचार केला जावा, असा सल्लाही फडणवीस यांनी बापट यांना दिला.
‘गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सण-उत्सव साजरे करताना ते जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने साजरे झाले तर अधिक चांगले. याबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झाली आहे. त्यामुळे पुण्यात डीजेचे जे स्तोम माजले आहे, ते लवकरच कमी होताना किंवा कायमचे बंद होताना दिसेल.”
सण-उत्सवांचे स्वरूप पारंपरिक करण्यासाठी केवळ कायद्याचा आधार घेऊन चालणार नाही, तर त्यासाठी नागरिकांचा सहभागही आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. हा बदल एका दिवसात होणार नसून त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यानंद बापटांच्या मराठीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
डीजेविरोधातील भूमिकेसोबतच आपल्या आगळ्या भाषाशैलीमुळे चर्चेत आलेले नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांच्याबाबतही फडणवीस यांनी भाष्य केले.
“विद्यानंद बापट यांची मराठी ट्रेंडिंगला आहे. मराठीच्या शुद्धतेचा एक नमुना त्यांच्या भाषेतून समोर आला आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
मात्र, विचार मांडताना त्यातून इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपली भूमिका मांडताना ती सर्वसमावेशक असावी आणि सण-उत्सवांशी संबंधित सर्व घटकांच्या भावनांचा विचार व्हावा, असा संदेश फडणवीस यांनी दिला.
डीजेविरोधाला पाठिंबा, पण सामाजिक सलोख्याचाही संदेश
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेचे समर्थन करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामाजिक सलोखा आणि परस्परांच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App