विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप करत, प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादी तोंडपाठ ठेवावी आणि नावासह प्रत्येक मतदाराची माहिती व्यवस्थित तपासावी, असे आवाहन त्यांनी केले. Uddhav Thackeray
बीड विधानसभा मतदारसंघातील सुमारे २५० बूथ लेव्हल एजंट्सनी (बीएलए) मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करणे तसेच निवडणूक नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, अरविंद सावंत यांच्यासह बीडमधील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक यंत्रणा आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठे यश दिले; मात्र त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निकाल वेगळा लागला, असे ते म्हणाले.
मतदार नोंदणीतील कथित अनियमिततेचा मुद्दाही ठाकरे यांनी उपस्थित केला. बोगस मतदार नोंदणीबाबत सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी आवाज उठवला होता, असा दावा त्यांनी केला. लोकसभा ते विधानसभा या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५ लाख मतदारांची वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीत कोणतीही गाफीलपणा न करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या परिसरातील मतदार यादी बारकाईने तपासणे, मतदारांची माहिती अचूक ठेवणे आणि निवडणुकीच्या काळात मतदारांशी सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बीडमधील शिवसैनिक आणि बीएलए कार्यकर्त्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष विमा योजनेचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. शिवसैनिक स्वतःचे घरदार आणि कुटुंब बाजूला ठेवून पक्षासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी काम करतात. अशा कार्यकर्त्याच्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढवल्यास त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी विमा योजना सुरू केली होती, असे त्यांनी सांगितले.
बीडच्या पदाधिकाऱ्यांनी ही योजना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने अधिक व्यापक स्वरूपात पुनरुज्जीवित केली असून, ही योजना केवळ बीडपुरती मर्यादित न ठेवता राज्यभरातील शिवसैनिक आणि बीएलए कार्यकर्त्यांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App