डीजेच्या वादातून विद्यानंद बापट लक्ष्यावर; ‘नक्षली मानसिकते’चा आरोप, पोलिस तक्रारीची तयारी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक आणि लेझरच्या वापरावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलिस तक्रारीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर अराजकवादी आणि ‘नक्षली मानसिकते’चे असल्याचा आरोप केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत बापट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केली असून, पोलिसांकडे अधिकृत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. Vidyanand Bapat

गणेशोत्सव २०२६च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत आयोजित बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराविरोधात विद्यानंद बापट यांनी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला. बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बापट चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

‘गणेशोत्सवाच्या परंपरेला लक्ष्य करू नये’

दरम्यान, शशांक महाजन यांनीही बापट यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. बापट यांनी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरच आपली भूमिका मांडावी; मात्र पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाला लक्ष्य करू नये, अशी भूमिका महाजन यांनी मांडली आहे.



दुसरीकडे, ध्वनीप्रदूषणाविरोधातील या भूमिकेला डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांचीही साथ मिळाली आहे. गणेशोत्सवादरम्यान उच्च क्षमतेचे डीजे, ध्वनिक्षेपक आणि नियमभंग होत असल्याचा आरोप करत केळकर यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) तक्रार केली आहे.

NHRCकडून MPCBला नोटीस

ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा केळकर यांनी तक्रारीत उपस्थित केला. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) नोटीस बजावली असून, प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुण्यातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा वाद आता प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवरही पोहोचला आहे.

उच्च क्षमतेच्या साउंड सिस्टीमवर पोलिसांचा इशारा

यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनीही ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘प्रेशर मिड’ आणि ‘प्लाझ्मा साउंड’सारख्या उच्च क्षमतेच्या उपकरणांच्या वापराबाबत इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्याची कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गणेश मंडळांना निश्चित मर्यादेतच बास आणि टॉपचा वापर करण्याची परवानगी राहणार आहे. छुप्या पद्धतीने अतिरिक्त ध्वनियंत्रणा बसवून नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून प्रत्यक्ष तपासणी करून कारवाई केली जाणार आहे.

लेझरवरही प्रशासनाचे निर्बंध

दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर झोतांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. तीव्र लेझर झोतांमुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे, ध्वनिक्षेपक आणि लेझरचा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे असून, विद्यानंद बापट यांच्याविरोधातील प्रस्तावित पोलिस तक्रारीमुळे या वादाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Vidyanand Bapat Accused of ‘Naxalite Mindset’; Police Complaint Planned

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात