विशेष प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले विद्यानंद बापट यांना गुरुवारी पुण्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
टिळक रोडवरील काशाळे चौकात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना काही तरुणांनी त्यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे. बापट हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. याचवेळी काही जणांनी त्यांना बोलण्यापासून रोखले आणि त्यानंतर मारहाण केली.
घटनेनंतर प्रतिक्रिया देताना बापट यांनी काही तरुणांनी आपण वृत्तवाहिनीशी बोलत असताना अडथळा आणल्याचा आरोप केला. आपल्या भूमिकेला विरोध असल्याने आपल्याला मारहाण करण्यात आली असावी, असेही त्यांनी म्हटले. मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देता येत नसल्याने अशा पद्धतीचा अवलंब केला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 37 वर्षीय विद्यानंद बापट हे नारायण पेठेत राहणारे बीपीओ क्षेत्रातील व्यावसायिक असून मूळचे रत्नागिरीचे आहेत.
पुणे महापालिकेने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीत बापट यांनी डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी जोरदार शाब्दिक वाद झाला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर त्यांना बैठकीतून बाहेर नेण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
बापट यांनी आपली भूमिका गणेशोत्सव किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यांचा विरोध अतिउच्च आवाजातील डीजे, लाऊडस्पीकर आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच राजकीय सभा, मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांनाही समान ध्वनी नियम लागू झाले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App