६ वर्षांनंतर दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; हायकोर्टाचा CBI तपासाचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज बुधवारी 2 सप्टेंबर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय अधिकारी नियुक्तीचे आदेश दिले असून BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. न्यायालयाने हा निकाल दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर दिला आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी पोलिसांनी केलेल्या तपासावर प्रश्न उपस्थित करत मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला आणि नव्याने तपास करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत काही लोकांची नावे नमूद करत आरोपही करण्यात आले. सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेतून या प्रकरणी एफआयआर नोंदवून नव्याने तपास केला जावा, आणि विशेषतः हा तपास सीबीआयमार्फत केला जावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे या याचिकेला मान्य करत हा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांना आपल्याकडील पुरावे आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची संपूर्ण माहिती सीबीआयला द्यावी लागणार आहे.

सुनावणीदरम्यान खंडपीठाने पोलिसांच्या तपासातील विसंगतींवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा 12 व्या मजल्यावरून पडल्याचे सांगितले जाते. मात्र, तिच्या चेहऱ्याची इतर नाजूक हाडे सुरक्षित असताना केवळ दातच कसे फॅक्चर झाले, असा सवाल न्यायालयाने विचारला. सरकारी वकिलांनी ‘ती तोंडावर पडली असावी’ असा युक्तिवाद केला असता, चेहऱ्यावरील इतर भागांवर गंभीर दुखापती का नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली.



एवढ्या उंचीवरून पडल्यानंतर शरीराला गंभीर जखमा झाल्या असताना तिच्या कपड्यांवर अपेक्षित रक्ताचे डाग का आढळले नाहीत, या विसंगतीकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. राज्य सरकारने पालकांनी ५ वर्षांनी हत्येचा आरोप केल्याचा मुद्दा मांडला असता, न्यायालयाने सरकारलाच धारेवर धरलेः पालकांनी पाच वर्षांनी दाद मागितली, पण या पाच वर्षांत पोलिसांनी काय केले? कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास पूर्ण का केला नाही? दिशा ही त्यांची एकुलती एक मुलगी होती, धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला असताना पोलिसांनी थेट एफआयआर न नोंदवता केवळ आकस्मिक मृत्यू म्हणून कलम 174 अंतर्गत मर्यादित चौकशी का केली, तसेच इतकी वर्षे उलटूनही शवविच्छेदन अहवाल कुटुंबीयांना का दिला नाही, यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. घटनास्थळाचे थेट सीसीटीव्ही फुटेज नसणे, बंद दरवाजाबाबत साक्षीदारांच्या जबाबातील तफावत आणि शवविच्छेदनाच्या नियमांचे पालन झाले का, यावरही प्रश्न उपस्थित झाले.

सरकारी वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना याचिका फेटाळण्याची मागणी केली होतीः पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही घातपात आढळला नसून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि फॉरेन्सिक अहवालानुसार दिशावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही, हे स्पष्ट करण्यात आले होते. दिशासोबत राहणारे रोहन राय यांच्या जबाबाचा संदर्भ देत, दिशा तणावाखाली होती आणि तिने आत्महत्या केल्याचे सरकारने सांगितले होते. तसेच ६ वर्षांनंतर या प्रकरणाचे राजकीय भांडवल केले जाऊ नये, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला होता. यावर याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. निलेश ओझा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देत, हत्येचा संशय असताना निव्वळ अपघाती मृत्यूची चौकशी करणे पुरेसे नाही, असा युक्तिवाद करत स्वतंत्र तपासाची मागणी लावून धरली होती.

या प्रकरणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील निलेश ओझा यांनी सांगितले की, न्यायालयाने सीबीआयला सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याचे, एफआयआर दाखल करण्याचे आणि तपासासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मालवणी पोलीस ठाण्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. याशिवाय, पुराव्यांवरून ज्यांचे नाव समोर येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याउलट, ज्यांच्याविरुद्ध पुरावा नसेल, त्यांना आरोपी केले जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जर सीबीआयने नकारात्मक अहवाल सादर केला, तर त्यावर आक्षेप घेण्याचा आणि प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार आम्हाला (दिशाच्या वडिलांना) राहील. न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. अशी माहिती वकिलांनी प्रसार माध्यमांना दिली.

दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि खळबळ उडाली. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्या असल्याचे वाटत होते, परंतु, कालांतराने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, दिशाच्या मृत्यूच्या अवघ्या सहा दिवसांनंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याचा सुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही प्रकरणांचा संबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. पोलिसांच्या तपासानुसार दिशाने आत्महत्या केली होती. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत विविध दावे करण्यात आले. तिच्या मृत्यूचा संबंध सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी जोडला गेला. काही राजकीय नेत्यांनीही या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला.

Disha Salian Death Case: Court Orders CBI Probe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात