विशेष प्रतिनिधी
मुंबई : अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान अभिनेता अजय देवगन तसेच अभिनेता टायगर श्रॉफ यांना पानमसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातीप्रकरणी प्रशासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला अद्यापही या तिन्ही कलाकारांनी उत्तर दिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. एफडीएने 14 दिवसाच्या आत उत्तर देण्याचे नोटिसेत म्हटले होते.
महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही अभिनेत्यांना नोटिसा बजावून आठवड्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी अद्याप त्यांच्याकडून एफडीए कडे कोणतेही उत्तर सादर करण्यात आलेले नाही.
एफडीएच्या म्हणण्यानुसार, संबंधित जाहिरातींमध्ये वापरण्यात आलेले ब्रँड नाव, संवाद आणि जाहिरातीचे सादरीकरण यामुळे एका खासगी ब्रँडचा पानमसाल्याशी संबंध जोडला जात असल्याचा आरोप आहे. जाहिरातीमध्ये उत्पादन ‘विमल इलायची’ म्हणून सादर केले जात असले तरी त्यामागे अप्रत्यक्षपणे पानमसाला ब्रँडची जाहिरात केली जात असल्याचा FDAचा दावा आहे. याच कथित सरोगेट जाहिरातीवरून तिन्ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
महाराष्ट्रात १३ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पानमसाल्यासारख्या प्रतिबंधित उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर FDAकडून संबंधित जाहिरातींची दखल घेण्यात आली असून, प्रतिबंधित उत्पादनांशी ब्रँडचा अप्रत्यक्ष संबंध जोडणाऱ्या जाहिरातींबाबत चौकशी सुरू आहे.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही काही जबाबदाऱ्या लागू होतात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (अॅडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स) रेग्युलेशन्स, २०१८ नुसार जाहिरातीत करण्यात येणारे दावे सत्य आणि अचूक असणे आवश्यक आहे.
या नियमांचा उद्देश ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, जाहिरातींमधील दावे स्पष्ट आणि सत्य असावेत, हा आहे. हे नियम २०१८ मध्ये तयार करण्यात आले असून २०१९ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात FDAने उपस्थित केलेल्या कथित सरोगेट जाहिरातीच्या मुद्द्यावर शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. कारणे दाखवा नोटिशींना त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App