विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होण गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. CM Fadnavis
गणेशोत्सव-२०२६ निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार राज्यभर पुढे नेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा जपताना शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकासह प्रशासन, मंडळे आणि विविध संघटनांवर असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
विविध महानगरपालिका क्षेत्रांतील गणेशमूर्तींच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवावेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत आणि रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध असेल, याची विशेष काळजी घ्यावी. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम, 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांसाठी मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. त्यासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
फटाके, लाऊडस्पिकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सर्व मंडळांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पुन्हा पडताळणी करावी. विशेषतः मोठ्या मूर्ती असलेल्या मंडळांना आवश्यक सूचना देऊन सर्व व्यवस्था सुरक्षित असल्याची खात्री करावी. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाने मागील वर्षीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे मंडळांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पीओपीच्या मूर्ती समुद्रात किंवा नदीपात्रात विसर्जित होऊन प्रदूषण होणार नाही, यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शासनाने मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून मंडळांच्या सूचनांचाही त्यात समावेश करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील सुमारे 1 हजार 850 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलीस किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी. मोठ्या मूर्तींची वाहतूक करताना मूर्तीची रचना, नट-बोल्ट, वेल्डिंग आणि अन्य जोडणी सुरक्षित असल्याची खात्री करावी. आगमन आणि विसर्जनावेळी लहान मुले तसेच भाविकांना मूर्तीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (दूरदृश्यप्रणालीद्वारे), गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, तसेच मंत्रालय, मुंबई महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App